ऐकलं का ! ४६ कोटींची इमारत; पण शिपायांविना भिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:46+5:302021-09-14T04:39:46+5:30
सोमनाथ खताळ बीड : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व व मानसिक आरोग्य केंद्र आणि स्त्री रुग्णालयाची इमारत ४६ ...
सोमनाथ खताळ
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व व मानसिक आरोग्य केंद्र आणि स्त्री रुग्णालयाची इमारत ४६ कोटी रुपये खर्चून उभा केली. येथे डॉक्टर, परिचारिका असल्या तरी शिपायांविना ही इमारत भिकारी आहे. या दोन्ही रुग्णालयांत एकही शिपाई नाही. तसेच करोडो रुपयांचे साहित्यही सुरक्षारक्षकाविना रामभराेसे असल्याचे उघड झाले आहे.
स्व. विमल मुंदडा आरोग्यमंत्री असताना लोखंडी सावरगावला दोन स्वतंत्र रुग्णालये तयार करण्यात आली. यासाठी निधी उपलब्ध करून तात्काळ बांधकामालाही सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठे रुग्णालय म्हणून ओळख झाली. कोरोनाकाळात सर्वात मोठे कोरोना रुग्णालय म्हणून मराठवाड्यात ओळख झाली. कोरोनात कंत्राटी कर्मचारी असल्याने रुग्णांना सेवा मिळाली; परंतु आता येथे एकही कंत्राटी कर्मचारी नाही. नियमितमध्ये डॉक्टर, परिचारिका व इतर पदे भरती केलेली आहेत; परंतु शिपायांची भरती नाही. कुशल, अकुशल पद्धतीने ही पदे भरायची असली तरी अद्याप याला मुहूर्त लागलेला नाही. शिपाई नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ही पदे भरण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह सामान्यांनी केली आहे.
उपसंचालकांच्या नुसताच भेटींचा धडाका
जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील सर्वांत सुंदर इमारत असलेले लोखंडी सावरगावचे रुग्णालय आहे. तसेच लातूरहूनही जवळ असल्याने उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांचा सारखाच येथे दौरा असतो. पाहणी करून मार्गदर्शन करून जाण्यापलीकडे ते काहीच करत नसल्याचे सांगण्यात आले. शिपाई नाहीत, हे माहिती असतानाही आणि अनेकदा पत्र देऊनही काहीच कारवाई न झाल्याने उपसंचालकांबद्दल संताप व्यक्त होत आहे.
डॉक्टर उचलतात बेड, सिस्टर मारतात झाडू
शिपाई नसल्याने सर्व कामे डॉक्टर, परिचारिकांनाच करावी लागतात. अनेकदा परिचारिकाच हाती झाडू घेऊन स्वच्छता करतात, तर रुग्णांच्या सोयीसाठी डॉक्टर बेड उचलून नियोजन करतात. अधिकाऱ्यांनाही स्वत:च उठून पाणी घ्यावे लागत असल्याचे चित्र येथे आहे.
---
या रुग्णालयात पद भरती करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. कोरोनातील कंत्राटी कर्मचारी कमी केल्याने स्वच्छता, रुग्णांची सेवा आदी अडचणी वाढल्या आहेत. या पद भरतीबाबत आपण पाठपुरावा करतच आहोत.
नमिता मुंदडा, आमदार केज
--
शिपाई नसल्याने समस्या वाढत आहेत. रुग्ण कमी आहेत, म्हणून ठीक आहे; परंतु ते वाढल्यावर खूप अडचणी येतील. तसेच सुरक्षारक्षकही नाहीत. या दोन्ही गोष्टींबाबत उपसंचालक यांना किमान १० वेळा पत्र दिले आहे; परंतु अद्याप यावर कारवाई झालेली नाही.
डॉ.चंद्रकांत चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, लोखंडी सावरगाव
130921\13_2_bed_16_13092021_14.jpeg
लोखंडी सावरगाव इमारत