ऐकलं का ! घाणीचे साम्राज्य असलेल्या बीड शहराचा स्वच्छतेत देशात ६७ वा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 06:10 PM2021-11-22T18:10:26+5:302021-11-22T18:12:20+5:30
Swachh Bharat Abhiyan in Beed: गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३वा क्रमांक होता. यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत. तरीही बीड पालिकेने ६७वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. तसेच अपवादात्मक वगळता सर्वच रस्त्यांची चाळणी झाली असून लाखो बीडकरांना याचा त्रास होत आहे. असे असले तरी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये ( Swachh Bharat Abhiyan 2021) बीड पालिका देशात ६७ व्या क्रमांकावर ( Beed Nagarpalika Ranks 67th in Swachh Bharat Abhiyan ) असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता सर्वेक्षण करणाऱ्या समितीने काय पाहून बीड पालिकेला हा क्रमांक दिला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
देशात प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले जाते. यावर्षीही ते नेहमीप्रमाणे राबविण्यात आले. स्वच्छता, रस्ते, शौचालये, कागदपत्रे आदींची अचानक भेट ऑनलाईन तपासणी केली जाते. देशातील १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या गटात जवळपास ३७५ पालिकांनी यात सहभाग घेतला होता. यात बीड पालिकेचाही समोवश होता. एप्रिल २०२१ मध्ये एका पथकाने बीड शहराची तपासणी केली होती. यात बीड पालिकेला ६ हजार पैकी ३ हजार ६२१.३१ एवढे गुण मिळाले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत बीड पालिका देशात ६७ व्या स्थानी असल्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. आरोग्य व शहर विकास मंत्रालयाने हे सर्वेक्षण केले होते. हा निकाल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. बीड शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, ठिकठिकाणी नाल्य तुंबलेल्या आहेत, रस्ते उखडले असून पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागते. हद्द वाढ भागात आजही काही लोक उघड्यावर शौचास बसतात. मग काय पाहून मंत्रालयाने पालिकेला देशात ६७ वा क्रमांक दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी आलेली समितीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांचीच चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वणी नॉट रिचेबल होता. तर अभियंता राहुल टाळके यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.
आगोदर ११३ वा, यावर्षी ६७
गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३वा क्रमांक होता. यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत. तरीही बीड पालिकेने ६७वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे.
२७ लाख खर्चूनही शहर घाणच
शहरात स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी व्यक्तीला दिलेले आहे. त्यांना एका घरामागे ५१ रुपये दिले जातात. महिन्याकाठी पालिका या कंत्राटदाराला २७ लाख रुपये देतात. परंतु तरीही शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. हा कंत्राटदार कायमच वादात सापडलेला आहे. कामगारांचे वेतन न देणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे आदी तक्रारी त्यांच्याविरोधात आहेत. तरीही या कंत्राटदारावर कसलीच कारवाई अद्याप झालेली नाही.