चिंचाळ्यात दुसऱ्या दिवशीही कहर; पुन्हा ५१ रुग्ण निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:22+5:302021-07-19T04:22:22+5:30
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे दुसऱ्या दिवशीही अतिसाराचे तब्बल ५१ रुग्ण निष्पन्न झाले. आता एकूण रुग्णसंख्या १३६ झाली ...
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे दुसऱ्या दिवशीही अतिसाराचे तब्बल ५१ रुग्ण निष्पन्न झाले. आता एकूण रुग्णसंख्या १३६ झाली आहे. तसेच उपाययोजनांसाठी आरोग्य पथक गावात तळ ठोकून आहे. तसेच सार्वजनिक नळ योजना तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या साथीमुळे मात्र ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चिंचाळा गावात ६९४ घरे असून, ३ हजार ४९१ लोकसंख्या आहे. या गावात मागील चार दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावात अतिसाराचे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ८४ रुग्ण आढळल्यानंतर रविवारी आणखी ५१ रुग्णांची भर पडली. उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक दाेन दिवसांपासून गावात तळ ठोकून आहे. बाधित रुग्णांना उपकेंद्रात आणून त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत. अद्याप एकाही रुग्णाची प्रकृती गंभीर नसली तरी वृद्धांचाही यात समावेश असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, रविवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात पाहणी करून लिकेज व्हाॅल्व, विंधनविहिरींची पाहणी केली. तसेच लिकेज दुरुस्तीबाबत सूचना केल्या. सरपंच शिवाजी मुंडे यांनीही तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठी गावातील नळ याेजना तात्पुरत्या स्वरुपात बंद केली असून, खासगी बोअरमधून पाणीपुरवठा केला जाणार आहे. असे असले तरी ग्रामस्थांच्या मनात भीती कायम असल्याचे दिसते.
यांनी दिली गावात भेट
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या सुचनेवरून अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, संदीपान मांडवे, गटविकास अधिकारी कांबळे यांनी गावात भेट देत पाहणी केली.
लिक्विड क्लोरीनचे वाटप करावे
गावात पसरलेल्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी साठ्यांमध्ये टाकण्यासाठी लिक्विड क्लोरीनचे वाटप करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाकडून ते वाटप केले जाईल, असे डॉ. घुबडे म्हणाले.
---
रुग्ण वाऱ्यावर सोडून डॉक्टर गायब
चिंचाळा गावात १३६ रुग्ण आढळले. त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी कुप्पा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची आहे. परंतु, हे डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून निघून जातात. विशेष म्हणजे कुप्पा येथे डॉ. मंजूश्री दुल्लरवार या नव्यानेच रुजू झालेल्या आहेत. नवीन असताना उत्साहाने काम करण्याऐवजी त्यांच्याकडून अशा प्रकारे उंटावरून शेळ्या हाकल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामस्थ सीईओ व डीएचओ यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
---
गावात सात दिवस सर्वेक्षण केले जाणार आहे. आतापर्यंत १३६ रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार केले आहेत. ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे. तसेच लिक्विड क्लोरीन पाणी साठ्यांमध्ये टाकावे. थोडाही त्रास जाणवल्यास आरोग्य पथकाला कळवावे.
डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी वडवणी
180721\18_2_bed_13_18072021_14.jpeg
चिंचाळा उपकेंद्रात रूग्णांची तपासणी करून आढावा घेताना जिल्हास्तरीय पथक दिसत आहे.