बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 07:54 AM2022-03-01T07:54:03+5:302022-03-01T07:56:42+5:30

सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाकडून तीन ठिकाणी छापासत्र

Hawala racket exposed in Beed; unaccounted amount of Rs 51 lakh seized | बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत

बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत

Next

बीड: आयकर चुकवून टोकन पध्दतीने पैशांची देवाणघेवाण करणाऱ्रूा हवाला रॅकेटचा सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी पर्दाफाश केला. शहरात तीन ठिकाणी धाडी टाकून तिघांना ताब्यात घेत सुमारे ५१ लाख रुपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत केली.

शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या हवाला रॅकेट सुरु असल्याची माहिती केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक रवाना केले. या पथकाने शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स व सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एका ठिकाणी छापा टाकला. सायंकाळी साते ते रात्री आठ दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
यात अनुक्रमे ३५ लाख ७९ हजार रुपये, ९ लाख रुपये, ६ लाख ४१ हजार रुपये अशी एकूण ५१ लाख २६ हजार रुपयांची बेकायदेशीर रोकड आढळून आली.याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांना हिशेब देता आला नाही.

यावेळी तिन्ही ठिकाणच्या व्यवस्थापकांना ताब्यात घेतले. मयू विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे अशी त्यांची नावे आहेत. शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक बाळराजे दराडे, हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, दिलीप गित्ते, राजू वंजारे,पो.ना.विष्णू चव्हाण, रवी आघाव, संजय टुले, दीपक जावळे, अविनाश सानप यांचा कारवाईत सहभाग होता.

आयकर विभागाला देणार पत्र
दरम्यान, पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडलेल्या तिन्ही संशयितांकडे कसून चौकशी सुरु आहे. हवाला रॅकेट कसे चालायचे, किती रुपयांचा व्यवहार व्हायचा , कमिशन किती मिळायचे या बाबी चौकशीत निष्पन्न होतील. पोलीस आयकर विभागाला पत्र देणार असून ते पुढील कार्यवाही करणार आहेत.

पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल जप्त
कारवाई दरम्यान पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हवाला रॅकेटचे इतर ठिकाणचे कनेक्शन देखील या कारवाईमुळे समोर येण्याची शक्यता आहे. थेट कार्यालये थाटून हवाला रॅकेट सुरु असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Hawala racket exposed in Beed; unaccounted amount of Rs 51 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.