आरोग्यसेवक झाला म्हणून पेढे वाटले अन् रात्रीतून दुसऱ्याचेच आले नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 02:01 PM2021-08-09T14:01:56+5:302021-08-09T14:07:51+5:30
अंबादास सगर आणि अमोल काळे या दोघांची निवड झाल्याची अंतिम यादी ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा प्रकाशित करण्यात आली. मात्र, ८ ऑगस्ट रोजी यातील अमोल काळे हे नाव वगळून गजानन सुतार यांना घेण्यात आले.
बीड : उस्मानाबाद जिल्हा हिवताप कार्यालयात आरोग्यसेवक म्हणून निवड यादीत नाव आल्याने बीडच्या तरुणाने गावभर पेढे वाटले. ग्रामस्थांनी त्याचा सत्कारही केला. परंतु उस्मानाबाद आरोग्य विभागाने एका रात्रीत सावळागोंधळ करीत या तरुणाचे नावच गायब केले. हा प्रकार रविवारी उघड झाला आहे. हे मुद्दाम झाले नसून अनवधानाने झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त करून उस्मानाबाद आरोग्य विभागाने हात झटकले आहेत. असे असले तरी, या भरतीत अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
मार्च २०१९ साली आरोग्य विभागात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर २८ फेब्रुवारीला यासाठी लेखी परीक्षा झाली. १६ जुलै रोजी याचा निकाल लागला. त्यानंतर राज्याची एकत्र गुणतालिका लावण्यात आली. त्यापाठोपाठ जिल्हानिहाय यादीही लावली. यात निवड करताना जाहिरातीच्या ५० टक्केच जागा भरण्यात आल्या. उस्मानाबाद जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातही आरोग्यसेवक पदाच्या दोन जागा होत्या. यात अंबादास सगर आणि अमोल काळे या दोघांची निवड झाल्याची अंतिम यादी ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा प्रकाशित करण्यात आली. मात्र, ८ ऑगस्ट रोजी यातील अमोल काळे हे नाव वगळून गजानन सुतार यांना घेण्यात आले. हा प्रकार पाहून काळे यांनी आरोग्य विभागाला जाब विचारला असता, अनवधानाने चूक झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, निवड झाल्याने अमोलने गावभर पेढे वाटले होते. त्याचे कुटुंब खूश होते. एका कीर्तन सोहळ्यात सार्वजनिक सत्कारही केला. ग्रामस्थांनीही स्वागत केले आणि आता अचानक आपले नाव गायब झाल्याने आपला अपमान झाला आहे. माझे मानसिक खच्चीकरण झाले असून याला आरोग्य विभाग जबाबदार आहे. याची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी अमोल काळे यांनी केली आहे.
काय म्हणतात, उस्मानाबादचे अधिकारी...
याबाबत भरती प्रक्रियेचे अध्यक्ष तथा उस्मानाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे म्हणाले, संचालक व उपसंचालकांकडून आलेल्या सूचनांनुसार यादी लावली. सुरुवातीला यादी प्रकाशित केल्यानंतर, त्यात एक जागा माजी सैनिकासाठी होती, हे नंतर समजल्याने नाव बदलले. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले. तसेच सदस्य सचिव तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पांचाळ यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. हे कसे झाले तेच समजत नाही, असे सांगतानाही ते अडखळले. आपण उमेदवाराला लेखी पत्र देऊन चूक झाल्याचे कळवू, असेही डॉ. पांचाळ म्हणाले.
माझी निवड झाल्याच्या आनंदात सर्वत्र पेढे वाटले. माझा सत्कारही केला. आता अचानक नाव गायब केले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करून मला न्याय द्यावा. माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे. अनवधानाने चुका व्हायला ही लहान लेकरं नाहीत. यात मोठाघो ळ झाला आहे.
- अमोल काळे, उमेदवार.