वऱ्हाडी म्हणून आले अन् नवरीसाठी आणलेले साडेपाच तोळे दागिने चोरून निघून नेले!
By सोमनाथ खताळ | Updated: July 16, 2024 20:47 IST2024-07-16T20:46:34+5:302024-07-16T20:47:28+5:30
आष्टी तालुक्यातील एका मंगलकार्यालयात घडली घटना

वऱ्हाडी म्हणून आले अन् नवरीसाठी आणलेले साडेपाच तोळे दागिने चोरून निघून नेले!
कडा (जि.बीड): हळद आणि लग्न हे दोन्ही एकाच दिवशी असल्याने सकाळपासून मंगल कार्यालयात गर्दी होती. लग्नाला काही अवधी शिल्लक असतानाच नवरीच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील एका मंगलकार्यालयात घडली.
आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील साईनाथ बोडखे याचे चिरंजीव प्रदिप यांचा खाकाळवाडी येथील दिपक नवले यांची मुलगी निकीता हिच्याशी सोमवारी बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील एका मंगलकार्यालयात विवाह होता. सकाळी हळद आणि लग्न हे दोन्हीही विधी एकाच दिवशी असल्याने नवरदेवाच्या वडिलांनी नवरीसाठी मंगळसुत्र, मिनी गंठण, नथनी, कानातले झुंबके असे सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने आणले होते. हळदीचा कार्यक्रम चालू होता. त्यानंतर थोड्या वेळात लग्न लागणार असल्याने आवराआवर सुरू होती. नवरदेवाच्या नातेवाईक असलेल्या महिलेच्या पर्समध्ये हे दागिने होते. पण घाईगडबडीची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली.
या प्रकरणी नवरदेवाचे वडिल साईनाथ बोडखे यांनी आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात सोने चोरीची तक्रार दाखल केली आहे.