‘तो’ तक्रारदार गोत्यात, निवेदन देणारे तोंडघशी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:34 AM2021-09-19T04:34:24+5:302021-09-19T04:34:24+5:30
बीड: पोलिसांनी परस्पर अदखलपात्र गुन्हा नोंदविल्याचा दावा करत पोलीस अधीक्षकांच्या नावे शपथपत्र देणारा व्यक्ती शिवाजीनगर ठाण्यात तक्रार ...
बीड: पोलिसांनी परस्पर अदखलपात्र गुन्हा नोंदविल्याचा दावा करत पोलीस अधीक्षकांच्या नावे शपथपत्र देणारा व्यक्ती शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला होता. ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तथ्यहिन आरोप केल्याने तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देणारे शिवसेनेचे पदाधिकारीही तोंडघशी पडले आहेत.
नितीन रुपचंद गायकवाड (रा.नवगण राजुरी, ता.बीड) याने ३ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर ठाण्यात संदिपान बडगेंविरोधात तक्रार दिली होती. २ सप्टेंबर रोजी नगर रोडवर चहा पिताना धक्का लागल्याने शिवीगाळ करुन धमकावल्याचा त्यात उल्लेख होता; मात्र नितीन गायकवाडने ६ सप्टेंबर रोजी ‘यू टर्न’ घेत बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या नावे शपथपत्र देऊन आपण तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेलो नाहीत, संदिपान बडगेला आपण ओळखत नाही, पोलिसांनी परस्पर आपल्या नावे तक्रार नोंदवली असा दावा केला होता. दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक आर. राजा यांची भेट घेऊन निवेदन देत संदिपान बडगेंना गुन्ह्यात नाहक गोवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. शिवाजीनगर ठाण्यात नितीन गायकवाड हा तक्रार देण्यासाठी स्वत: आला व तक्रारीनंतर त्याने स्वाक्षरी केल्याचे उघड झाले आहे. यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज असल्याने नितीन गायकवाड याने शपथपत्राद्वारे पोलिसांवर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
....
आरोपांत तथ्य नाही. तो तक्रारदार स्वत: ठाण्यात येऊन गेल्याचे पुरावे आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो दिसत आहे. यासंबंधी वरिष्ठांना कळविले आहे.
- साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक शिवाजीनगर ठाणे
.....
खटाटोप कशासाठी? संदिपान बडगेंना काही महिन्यांपूर्वी एका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण केल्याने शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली होती. पोलीस नाईक जालिंदर बनसोडे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला होता. हा राग मनात धरुन बडगेंनी थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन देत बनसोडे यांनीच पुन्हा खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला. जुन्या कारवाईचा सूड उगवत बनसोडेंना अडकविण्यासाठी हा खटाटोप असल्याची पोलिसांत चर्चा आहे.
....