घरकुलासाठी त्याने उगारला कोयता, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:13+5:302021-04-05T04:30:13+5:30
दिंद्रुड येथे दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत भागुबाई विश्वनाथ चांदबोधले या प्रभाग ४ मधून विजयी झाल्या आहेत. त्यांचा मुलगा नारायण ...
दिंद्रुड येथे दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत भागुबाई विश्वनाथ चांदबोधले या प्रभाग ४ मधून विजयी झाल्या आहेत. त्यांचा मुलगा नारायण विश्वनाथ चांदबोधले हा रविवारी सकाळी बाजारात भाजीपाला खरेदी करून घरी जात होता. यावेळी विकास अशोक काटकर हा हातात कोयता घेऊन आला व तुझी आई ग्रामपंचायत सदस्य आहे, मला घरकुल मिळवून दे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली. इतक्यावर न थांबता हातातील कोयता उगारत तुला जिवेच मारतो अशी धमकी दिली. या घटनेनंतर हातात कोयता घेऊन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तर वारंवार फोनवर जातिवाचक शिवीगाळ करीत त्रास देत असल्याची फिर्याद नारायण चांदबोधले यांनी दिंद्रुड पोलिसांत दिली. त्यानुसार आरोपी विकास काटकर याच्याविरोधात धमकी देणे, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास माजलगाव उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश पाटील करीत आहेत.