महिलांवर चाकूचा वार करत साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:29+5:302021-07-31T04:34:29+5:30
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, बीड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, माजलगाव पोलीस उपविभागीय पोलीस अधीक्षक ...
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, बीड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, माजलगाव पोलीस उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी भरत राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.
दिंद्रुड पोलीस हद्दीत मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. यातच तेलगाव येथील धारूर रोडलगत असणाऱ्या श्रीकृष्ण पार्क येथील रोहाउसमध्ये राहणाऱ्या लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या घरी अज्ञात चार चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री बारा-एकच्या दरम्यान प्रवेश करीत महिला, पुरुषांसह कुटुंबीयांना मारहाण करीत महिलांच्या अंगावरील दागदागिने तसेच घरात ठेवण्यात आलेले रोख दोन लाख चाळीस हजार रुपये असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात वर्षा अशोक चव्हाण व शामल शिंदे या दोन महिला जखमी झाल्या. या धाडसी चोरीमुळे तेलगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, माजलगाव उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी भरत राऊत यांच्यासह दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, जखमींना तेलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात वर्षा अशोक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलीस जमादार बालाजी सुरेवाड, अनिल भालेराव, आकाश जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
उस्मानाबाद येथील श्वानपथक, बीड येथील ठसे तज्ज्ञ यांनी घटनास्थळी भेट दिली.
दिंद्रुड पोलिसात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असली तरी गेल्या काही दिवसांत चोरटे जेरबंद करण्यात दिंद्रुड पोलिसांना यश येत आहे. १० मोटारसायकलींसह २ चार चाकी वाहनांचा दिंद्रुड पोलिसांनी शोध लावत चोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे.
300721\sanotsh swami_img-20210730-wa0097_14.jpg~300721\sanotsh swami_img-20210730-wa0095_14.jpg