सामान्य जनतेसाठी मतदारसंघात आरोग्य अभियान राबवणार : बाळासाहेब आजबे- A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:52+5:302021-03-10T04:32:52+5:30
आष्टी, पाटोदा, शिरूर या तिन्ही तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ...
आष्टी, पाटोदा, शिरूर या तिन्ही तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये महात्मा फुले आरोग्य अभियान व पंतप्रधान जन आरोग्य अभियान लवकरच राबविण्यात येणार आहे. शासनाने प्रमाणित केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य कर्मचारी व आमचे आरोग्य दूत जाऊन त्यांना प्रत्यक्ष लाभ कसा घेता येईल, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या कामात सर्व आशा सेविका, सी.एस.सी. सेंटर, आपले सरकार केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच , मित्रमंडळ व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात येणार आहे.
आपला मतदारसंघ हा ग्रामीण असून कुठल्या न कुठल्या आजारामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिकहानीपासून संरक्षण व्हावे हा एकमेव उद्देश ठेवून ही महत्त्वाची योजना शंभर टक्के राबवण्याचा माणस केला आहे. या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयेपर्यंत ऐकून वेगवेगळ्या १,३९४ आजारावरती मोफत उपचार केले जातात. मतदारसंघांमध्ये शासनाने निवडलेले ६५ हजार लाभार्थी असून त्यापैकी फक्त ८ हजार लाभार्थींची नोंदणी झालेली आहे. उर्वरित ५७ हजार लाभार्थ्यांपर्यंत आमचा आरोग्य दूत पोहोचणार असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे. यामुळे वेगवेगळ्या १,३९४ आजारावरती प्रत्यक्ष उपचाराचा लाभ गरजवंतांना घेता येणार आहे. त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी लवकरच हे अभियान सुरू करण्यात येणार असून मतदार संघातील जनतेने या अभियानामध्ये सहभागी होऊन आमदार बाळासाहेब आजबे मित्रमंडळाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरोग्य दूत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.