असंसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांना दिले ‘हेल्थ कार्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:08 AM2020-01-14T00:08:54+5:302020-01-14T00:09:33+5:30
अतिताण, मधुमेह, ह्रदयाचे विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात उपचार घेतल्यानंतर त्यांना तात्काळ ‘हेल्थ कार्ड’ दिले जात आहे.
बीड : अतिताण, मधुमेह, ह्रदयाचे विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात उपचार घेतल्यानंतर त्यांना तात्काळ ‘हेल्थ कार्ड’ दिले जात आहे. आतापर्यंत १३६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. असंसर्गजन्य विविध आजार असलेल्या रुग्णांची आता नोंद होण्यास सुरूवात झाली आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिताण, ह्रदयविकार यासारख्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यापुर्वी सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन याची माहिती देण्यात आली. याबाबत सर्वेक्षणही करण्यात आले होते. जिल्ह्यात सर्वच आरोग्य संस्थेत यावर उपचार होत असल्याने सामान्यांना मोठा फायदा होत आहे. हाच धागा पकडून २९ डिसेंबर २०१९ रोजीही जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष (बाह्यरुग्ण विभागात २ क्रमांकाच्या कक्षात) स्थापन करण्यात आला. येथे वैद्यकीय तज्ज्ञांसह कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली. यापूर्वी केवळ उपचार झाल्यानंतर वहिवर लिहून दिले जात होते. मात्र, आता त्यांना हेल्थ कार्ड दिले जात आहे.
या कार्डवर नाव, गाव, संपर्क, आधार क्रमांक, व्यवसाय, रोगनिदान, ओपीडी नं., सांकेतिक क्रमांक लिहिला जातो. रुग्णाची संपूर्ण माहिती घेतल्यावर त्याच्यावर उपचारास सुरूवात होते. प्रत्येक महिन्याला त्यांना एकदा उपचारासाठी बोलावले जाते. याची सर्व नोंद हेल्थ कार्ड व रुग्णालय रजिस्टरमध्ये केली जात आहे. या प्रक्रियेमुळे असंसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांची माहिती सहज जमा करून त्यावर उपचार करणे सोपे होत आहे. याचा फायदा सामान्य रुग्णांना होत असून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत मुळे, डॉ.अक्षय भोपळे, डॉ.आशिष कोठारी, डॉ.अजय राख, परिचारिका भाग्यश्री कदम ही टिम रुग्णांवर उपचार करीत आहे.
असंसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांची तपासणी, उपचार करण्यासह समुपदेशन केले जाते. त्यांना हेल्थ कार्डही दिले जात आहे. यात सर्व माहिती असेल. रुग्णाने प्रत्येक वेळी उपचाराला येताना हे कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. विशेष कक्ष स्थापन केल्याने रुग्णांवर दर्जेदार उपचार होत आहेत.
- डॉ.अशोक थोरात
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड