ऊसतोडणीला जाण्यापूर्वीच ३ हजार कामगार महिलांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:27 PM2019-11-11T12:27:57+5:302019-11-11T12:29:48+5:30
गर्भपिशवी शस्त्रक्रिया प्रकरणानंतर आरोग्य विभागाची दखल
बीड : बीड जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या १३ हजार गर्भपिशवी शस्त्रक्रिया प्रकरण राज्यात गाजले होते. यावर चौकशी समितीने ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर आरोग्य तपासणीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे बीड आरोग्य विभागाने शनिवारी जिल्ह्यातील ३ हजार ९२ महिला कामगारांची आरोग्य तपासणी केली. राज्यात सर्वत्र अशा तपासणी केल्या जाणार असून बीड जिल्ह्यातून याची सुरूवात झाली आहे.
बीड जिल्ह्यातील ऊसतोडणीला गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व महिलांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने केले होते. यामध्ये जिल्ह्यात १३ हजार महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर निलम गोºहे यांच्या समितीने विविध सुचना सुचवून शासनाकडे सादर केल्या होत्या. यामध्ये कामगार महिलांची ऊसतोडणीला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर आरोग्य तपासणी करण्याचा मुद्दा होता. त्यानंतर आरोग्य संचालकांनी सर्व राज्यात तसे आदेश काढले. त्याप्रमाणे बीडमध्ये शनिवारी सर्व ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कामगार महिलांच्या मुलांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.
आयुर्मंगलम कार्डचेही वाटप
आरोग्य तपासणी झालेल्या सर्व महिलांचे बँक खाते उघडण्यात आले. त्यांना आरोग्य, गोल्डन व आयुर्मंगलम कार्ड देण्यात आले. हे कार्ड जेथे कामासाठी गेले आहेत, तेथील आरोग्य केंद्रात दाखविल्यास उपचार करणे सोपे होणार आहे. तसेच मोफत उपचार केले जाणार आहेत. आतापर्यंत पहिल्यांदाच असा प्रयोग राबविण्यात आला आहे.
बीडमध्ये २८ हजार ऊसतोड महिला कामगार
मिळालेल्या माहितीनूसार जिल्ह्यात २८ हजार ७०१ महिला ऊसतोडणीसाठी जाणार आहे. पैकी ३ हजार ९२ महिलांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. ७०३ महिलांना विविध आजार असल्याचे तपासणीतून समोर आले.
जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थिती
ऊसतोड कामगार महिला व त्यांच्या मुलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. तपासणी केलेल्या महिलांना आरोग्य, गोल्डन व आयुर्मंगलम कार्डचे वाटप केले. तसेच त्यांचे बँक खातेही उघडून देण्यात आले. एका दिवसात ३०९२ महिलांची तपासणी केली.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड