आरोग्यविभागाचे अपयश; कोट्यवधी खर्चूनही बाळांतपण होईना सुखरूप, राज्यात १४३५ माता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:29 PM2022-06-06T13:29:50+5:302022-06-06T13:30:32+5:30

आरोग्य विभागाच्या अपयशाने १६० मृत्यू वाढले :राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते.

Health department failure in Maharatra; 1435 mothers died in the state | आरोग्यविभागाचे अपयश; कोट्यवधी खर्चूनही बाळांतपण होईना सुखरूप, राज्यात १४३५ माता मृत्यू

आरोग्यविभागाचे अपयश; कोट्यवधी खर्चूनही बाळांतपण होईना सुखरूप, राज्यात १४३५ माता मृत्यू

googlenewsNext

- सोमनाथ खताळ
बीड :
राज्यातील माता मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अपयश आल्याचे दिसत आहे. २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १४३५ मातांचा जीव गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल १६० मृत्यू वाढल्याचे समोर आले आहे. रक्तस्त्राव, कोरोना, उच्च रक्तदाब व त्यामुळे होणारी गुंतागुंत यामुळेच सर्वात जास्त मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे महापालिकांच्या ठिकाणीच हे मृत्यू वाढले आहेत. जिल्हास्तरावर मृत्यूचा आकडा ४५ ने घटला आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलांचे बाळांतपण सुखरूप हाेत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. पोस्टर, योजना, जनजागृती, औषधी, तज्ज्ञ, सोयी, सुविधा, समित्या आदींचा यात समावेश आहे. असले तरी राज्यातील एकूण माता मृत्यू दर कमी करण्यात त्यांना यश येत नसल्याचे दिसते. २०२०-२१ मध्ये राज्यात १ हजार २७५ मातांचा मृत्यू झाला होता. यात घट होण्याऐवजी २०२१-२२ मध्ये १६० ने वाढ होऊन १४३५ एवढा झाला आहे. यावरून आरोग्य विभाग आणि यासाठी काम करणाऱ्या यंत्रणेचे अपयश चव्हाट्यावर आले आहे. आता तरी आरोग्य विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोणत्या कारणामुळे किती मृत्यू?
माता मृत्यू होण्यास अनेक कारणे आहेत. याचे विवरण माता अन्वेषण समितीकडून करण्यात आले आहे. यामध्ये रक्तस्त्रावामुळे १३ टक्के मृत्यू होतात. तसेच जंतुसंसर्ग ७ टक्के, उच्च रक्तदाब व त्यामुळे होणारी गुंतागुंत १६ टक्के, कोरोनामुळे १८ टक्के, इतर कारणांमुळे १७ टक्के, कावीळ १ टक्का, हृदयरोग १ टक्का, रक्तक्षय ४ टक्के, गर्भाची गुंतागुंत १ टक्का, गर्भाची पिशवी फाटल्यामुळे १ टक्का आणि २१ टक्के मातांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण निश्चितच करता आलेले नाही.

या जिल्हा, शहरांत वाढले मृत्यू
जिल्ह्याच्या ठिकाणी ठाण्यात ३, पालघर ७, नंदुरबार २, पुणे ८, लातूर ३, यवतमाळ ५, बुलडाणा ३, नागपूर २, वर्धा ३, गडचिरोली ७ तसेच महापालिकांच्या ठिकाणी मालेगाव १, धुळे १३, जळगाव १७, अहमदनगर ४, पुणे ४६, पिंपरी चिंचवड २, सोलापूर ७, कोल्हापूर १७, सांगली ३३, औरंगाबाद २५, नांदेड १, अकोला १, नागपूर ४० असे मृत्यू वाढले आहेत.

२९ तालुक्यांमध्ये ५ पेक्षा जास्त माता मृत्यू
राज्यातील २९ तालुक्यांत ५ पेक्षा जास्त मृत्यू आहेत. यात मालेगाव, करवीर, कर्जत, गोंदिया, धारणी, साकरी, निफड, हातकलंगले, मिरज, अंबेरनाथ, निलंगा, धुळे, नंदुरबार, नवापुर, धानूरा, वर्धा, दिंडोरी, हावेली, अकोल, पुसद, कन्नड, सिल्लोड, कराड, पनवेल, भंडारा, जळगाव, अक्कलकुवा, काळवण, दौंड या तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यातील माता मृत्यूची आकडेवारी
२०२०-२१ २०२१-२२ कमी/वाढले
जिल्हास्तर ४५३ ४०८ ४५ ने कमी
महापालिका ८२२ १०२७ २०५ ने वाढले
एकूण १२७५ १४३५ १६० ने वाढले

Web Title: Health department failure in Maharatra; 1435 mothers died in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.