आरोग्य विभागाची साईट हॅक? बदल्यांची खोटी यादी व्हायरल अन् १२६२ डॉक्टरांचा वाढला 'बीपी'
By सोमनाथ खताळ | Published: June 10, 2023 04:30 PM2023-06-10T16:30:02+5:302023-06-10T16:30:57+5:30
आरोग्य विभागाकडून हा खोडसाळपणा असल्याचा दावा केला जात आहे
बीड : वैद्यकीय अधिकारी (गट-अ) यांच्या बदल्या पहिल्यांदाच ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत असतानाच आता आरोग्य विभागाची वेबसाईटच हॅक झाल्याचा संशय आहे. कारण शनिवारी पहाटेच्या सुमारास २०५ पानांवर १२६२ डॉक्टरांच्या बदल्या पडल्या. यात अनेकांची नावे उडाली तर काहींना दोन ठिकाणी पोस्टींग देण्यात आली. हा गोंधळ उडाल्यानंतर डॉक्टरांनी तक्रारी केल्या. त्यानंतर आरोग्य विभागानेच वेबसाईटवर कोणीतरी 'बेईमानी' केल्याचा खुलासा केला आहे. याबाबत तक्रार देणार असल्याचेही सांगण्यात आले.
राज्यातील शासकीय डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्या पहिल्यांदाच होत आहेत. मे महिन्यापासूनच याची प्रक्रिया सुरू झाली होती. अगोदर ज्येष्ठतेनुसार यादी प्रकाशित करून त्यांच्याकडून आवडीचे ठिकाणे मागविण्यात आले. उपसंचालक कार्यालयांकडून याची छाननी करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. परंतू अनेकदा या प्रक्रियेत वेळेनुसार याद्या प्रकाशित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे डॉक्टर संतप्त झाले होते. ३१ मे पर्यंत बदल्या होणार अशी चर्चा असतानाच याला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. असे असतानाच शनिवारी पहाटे २०५ पानांची यादी पडली. यात १२६२ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतू यातील त्रूटी पाहून काही डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आयुक्तांनी याचा खुलासा करत 'काही बेईमान घटकांची अवैध कृत्य आहे' असे म्हणत खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांनीच मोकळा श्वास घेतला.
कही खुशी, कही गम..
या बदल्यांच्या यादीत काही डॉक्टरांना मनासारखे ठिकाण मिळाले आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी झोपेतून उठण्याआधीच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. तर ज्यांची नावे नव्हती, अशांचा मात्र 'बीपी' वाढला होता. त्यांनी लगेच संचालक, आयुक्त कार्यालयात फोनाफोनी करून माहिती घेतली.
वेबसाईट हॅक झाल्याचा संशय
आरोग्य विभागाकडून हा खोडसाळपणा असल्याचा दावा केला जात असला तरी ही २०५ पानांची यादी 'ऑफिसरट्रॉन्सफर महा आरोग्य.कॉम' या साईटवरूनच डाऊनलोड केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एक तर कंत्राटदाराची चुक आहे किंवा ही साईट कोणी तरी हॅक केल्याचा संशय आहे. याचा तपास करावा, अशी मागणीही डॉक्टर संघटनांकडून केला जात आहे.
रात्री उशिरापर्यंत ऑर्डर येऊ शकते
व्हायरल झालेली २०५ पानांची यादी खोटी आहे. कोणी तरी खोडसाळपणा केला आहे. याबाबत आम्ही एफआयआर करणार आहोत. बदल्या होणार आहेत, परंतू शनिवारी रात्री उशिरापर्यंत ऑर्डर पडू शकतात.
- डॉ.स्वप्नील लाळे, संचालक, आरोग्य सेवा मुंबई