खासगीत कोरोना चाचणी करणाऱ्यांबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:16+5:302021-03-31T04:34:16+5:30
बीड : शहरात खासगी लॅबचालक कोरोना चाचण्या करीत आहेत. परंतु याची आरोग्य विभागाकडे नोंदच नसल्याचे समोर आले आहे. ...
बीड : शहरात खासगी लॅबचालक कोरोना चाचण्या करीत आहेत. परंतु याची आरोग्य विभागाकडे नोंदच नसल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनाही याची अधिकृत माहिती नाही. सध्या तरी दररोज २ हजारपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात असल्याने अंबाजोगाईतील एकमेव प्रयोगशाळेवर ताण वाढत आहे. खासगी लोकांकडून चाचणी केल्यानंतर याची माहितीही कळविली जात नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. यातील चाचणीच्या अहवालावरील विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज सरासरी २०० ते २५० रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागही हतबल झाला आहे. तसेच दररोज जिल्ह्यातून २ हजारपेक्षा जास्त संशयितांचे स्वॅब घेतले जात आहेत. यातील आरटीपीसीआरची तपासणी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत केली जात आहे. परंतु वाढत्या चाचण्या पाहता या प्रयोगशाळेवरही ताण वाढत आहे. त्यामुळे अहवाल येण्यास ३० तासांपेक्षा जास्त कालावधी लागत आहे.
दरम्यान, शहरात दोन ते तीन ठिकाणी खासगी लॅबवाल्यांकडून कोरोना चाचणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यांचे अहवाल किती खरे आणि किती खोटे, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. या चालकांकडून एका तपासणीसाठी ५०० ते १००० रूपये घेतले जात असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले. असे असले तरी बीडमधील लोक शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवत चाचण्या करताना दिसत आहेत. येथे केवळ नोंदणीसाठी १० रूपये शुल्क आकारले जाते. परंतु खासगी यंत्रणेबाबत आरोग्य विभाग पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याची माहिती घेऊन त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
काय म्हणतात अधिकारी...
शहरात खासगी लॅब चालक चाचणी करीत असतील तर माहिती घ्यावी लागेल. सामान्यांची शासकीय आरोग्य संस्थेत कोरोना चाचणी केली जात आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सांगितले. बीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट म्हणाले, मी पूर्ण माहिती घेऊन बोलतो.
---
शासकीय प्रयोगशाळा १
दररोज सरासरी चाचण्या २०००
आठवडाभरात चाचण्या १७०००
शासकीय संस्थेत चाचणीसाठी शुल्क १० रूपये
खासगीत शुल्क ५०० ते १०००