जिल्हा रुग्णालयातील कारवाई झालेल्या ‘त्या’ डॉक्टरकडून आरोग्य विभागाच्या डोळ्यात धूळफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:33 AM2019-09-15T00:33:41+5:302019-09-15T00:34:26+5:30
खाजगी सराव करीत नाही, असे प्रतिज्ञापत्र देऊन महिन्याला २० ते ३० हजार रुपये भत्ता उचलणाऱ्या सरकारी डॉक्टरांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. नुकत्याच कामचुकारपणामुळे कारवाई झालेल्या डॉ.बाळासाहेब टाक यांनीही असे प्रतिज्ञापत्र दिल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांचे जिल्हा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावरच खाजगी रुग्णालय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खाजगी सराव करीत नाही, असे प्रतिज्ञापत्र देऊन महिन्याला २० ते ३० हजार रुपये भत्ता उचलणाऱ्या सरकारीडॉक्टरांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. नुकत्याच कामचुकारपणामुळे कारवाई झालेल्या डॉ.बाळासाहेब टाक यांनीही असे प्रतिज्ञापत्र दिल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांचे जिल्हा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावरच खाजगी रुग्णालय आहे. येथे ते नियमित सराव करीत असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या डोळ्यात धुळफेक करुन भत्ता लाटणाºया या डॉक्टरवर फसवणूकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारी डॉक्टरांना खाजगी सराव करायचा असल्यास तसे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे. सराव केल्यास व्यवसायरोध भत्ता मिळत नाही. तर सराव न केल्यास मुळवेतनाच्या जवळपास ३५ टक्के वेतन त्यांना प्रतिमहिना दिले जाते. मात्र, जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची वेळेवर तपासणी न करता त्यांना वा-यावर सोडणा-या डॉ.बाळासाहेब टाक यांच्यावर ‘गौरी’ गणपतीच्या सणातच अस्थापनेवरुन काढून टाकण्याची कारवाई झालेली आहे. त्यांनी सराव करीत नसल्याबाबत लेखा विभागाला पत्र देऊन भत्ता घेतल्याचेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. डॉ. टाक यांचा जिल्हा रुग्णालयाच्या समोरच खाजगी दवाखाना आहे. तेथे त्यांच्या नावाचे फलकही असल्याचे समोर आले आहे.
आता यावर रुग्णालय प्रशासन काय कारवाई करते? हे येणारी वेळच ठरवेल. याबाबत डॉ. बाळासाहेब टाक म्हणाले, मी याबाबत नंतर बोलेन. थोडे कामात आहे.