आरोग्य सेवा छान; डॉक्टरांपेक्षा सुरक्षारक्षकांचीच भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:18 AM2018-12-09T00:18:25+5:302018-12-09T00:19:16+5:30
सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीमुळे जिल्हा रूग्णालय पुन्हा एकदा बदनाम झाले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीमुळे जिल्हा रूग्णालय पुन्हा एकदा बदनाम झाले आहे. येथे जरी आरोग्य सेवा चांगली मिळत असली तरी येथे येणाऱ्यांना मात्र सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की व अरेरावी केली जात असल्याचे समोर आले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना आणि वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही अधिका-यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मागील काही महिन्यात जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवेतील कारभार सुधारला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मात्र, दुस-या बाजूला रूग्ण व नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेले रक्षकच आता त्यांना धक्काबुक्की करू लागले आहेत. वास्तविक पाहता या रक्षकांना रूग्ण व नातेवाईकांना अरेरावी किंवा धक्का लावण्याचा कसलाच अधिकार नाही. मात्र, दादागिरी करीत सर्वसामान्यांच्या संयम व शांततेचा फायदा घेत येथील रक्षक त्यांना धक्काबुक्की करतात. तसेच महिला रक्षकही पुरूषांना धक्काबुक्की व अरेरावी करतात. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्यांना अपमान सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी असे प्रकार घडल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सकांनी यावर कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे रक्षकांचे मनोधैर्य वाढले असून, दिवसेंदिवस मुजोरी वाढत चालली आहे. त्यांच्या या वर्तणुकीमुळे जिल्हा रूग्णालयाची प्रतिमाही मलीन होत आहे. त्यामुळे या रक्षकांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महिला रक्षक उगारतात दंडुका
येथील महिला रक्षकही पुरूषांवर दंडुका उगारतात. त्यांना धक्काबुक्की करतात. प्रसुती विभाग व मुख्य प्रवेशद्वारावर असे प्रकार नेहमी पाहवयास मिळतात.
दिवसेंदिवस हे प्रकार वाढत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून प्रतिमा मलीन होत चालली आहे.