आरोग्य यंत्रणा 'व्हेंटिलेटरवर'; रुग्ण 'ऑक्सिजनवर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:49+5:302021-09-10T04:40:49+5:30
सोमनाथ खताळ बीड : जागतिक आरोग्य संस्थेच्या निर्देषानुसार चार खाटांमागे १ परिचारिका असावी; परंतु बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये ...
सोमनाथ खताळ
बीड : जागतिक आरोग्य संस्थेच्या निर्देषानुसार चार खाटांमागे १ परिचारिका असावी; परंतु बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये चार नव्हे तर तब्बल २४ खाटांमागे केवळ एक परिचारिका आहे. यातील बहुतांश रुग्ण हे गंभीर असतात, तसेच या सर्व रुग्णांसाठी २४ तास सेवेसाठी केवळ एकच डॉक्टर असल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उघड झाली. निधीचे कारण सांगत मनुष्यबळ कमी केल्यानेच ही 'आपत्ती' ओढावली आहे. त्यामुळे सध्या तरी आरोग्य यंत्रणा 'व्हेंटिलेटरवर' असून रुग्ण 'ऑक्सिजनवर' असल्याचे दिसते. उपचाराबद्दल तक्रारींमध्येही वाढ होत आहे. कोरोना सुरू झाल्यापासून आरोग्य विभागाकडून उपचाराबाबत गोंधळ उडविणारे निर्णय घेतले जात आहेत. अगोदर साध्या व आयसीयूमधील खाटांबाबत मनुष्यबळाची मर्यादा ठरवून दिली; परंतु आता मागील महिन्यातच निधीची कमतरता असल्याचे कारण सांगत कोरोनाकाळात भरती केलेले मनुष्यबळ कमी केले. नियमित व कंत्राटी डॉक्टर, कर्मचाऱ्यांकडून उपचार करून घेण्याचे आदेश अतिरिक्त संचालकांनी दिले. वास्तविक पाहता अगोदरच रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यात आता नियमित कामांसह कोरोनाचे काम वाढले आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता पडत आहे. ज्यांनी मनुष्यबळाबाबत नियम घालून दिले, आता त्यांच्याकडूनच हे सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे दिसते.
--
नियम काय सांगतो...
नियमानुसार साध्या चार खाटांमागे १ परिचारिका व आयसीयूमध्ये एका खाटासाठी एक परिचारिका तसेच २५ खाटांमागे १ फिजिशियन, १ भुलतज्ज्ञ आणि ४ वैद्यकीय अधिकारी आवश्यक आहे. याबाबत ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर आदेश काढून उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
--
१४४ रुग्णांसाठी १ डॉक्टर अन् ६ परिचारिका
बीडमधील स्वतंत्र कोविड रुग्णालयात गुरुवारी १४४ कोरोनाबाधित व संशयित रुग्ण उपचार घेत होते. यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी केवळ ६ परिचारिका आणि एका डॉक्टरवर होती. बाकी सर्व कॉलवरच उपलब्ध केले जात होते. एसीमध्ये बसून काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळ भरती करण्याची गरज आहे. ग्राऊंड लेव्हलवर काम करताना किती अडचणी येतात, हे देखील वरिष्ठांनी स्वत: भेट देऊन पाहण्याची मागणी होत आहे.
--
आता एकही कोरोना स्टाफ नाही
कोरोनाच्या लाटेत भरती केलेले डॉक्टर, कर्मचारी आगोदरच कमी केले होते; परंतु रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करून २४३ कर्मचारी ठेवले होते; परंतु गुरुवारी त्या सर्वांना नारळ देण्यात आला आहे. आता एवढ्या मोठ्या रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान असणार आहे.
--
कोरोनाकाळात भरती केलेला सर्व स्टाफ कमी केला आहे. नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडूनच आता उपचार करत आहोत. उपचाराबाबत तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घेत आहोत. वॉर्ड प्रमुखांची बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या आहेत.
डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड.