हृदयद्रावक ! पंचमीसाठी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना पित्यासह जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:17 PM2020-07-24T18:17:24+5:302020-07-24T18:18:39+5:30
शुक्रवारी सकाळी गावातील नागरिकांना नदीच्या पुलाजवळ दुचाकी दिसली. त्यामुळे वाहून गेल्याचा संशय वाढला.
गेवराई (जि. बीड ) : पंचमीच्या सणासाठी लेकरांना मामाच्या गावी घेऊन जाणाऱ्या पित्यासह दोन्ही मुलांना जलसमाधी मिळाली. गुरुवारी रात्री तालुक्यातील अमृता नदीच्या पुरात तिघे दुचाकीसह वाहून गेले. शुक्रवारी सकाळी मुलीचा मृतदेह सापडला असून मुलगा आणि वडिलांचा शोध सायंकाळपर्यंत सुरु होता. कृष्णा बाळासाहेब घोरपडे (३०), प्रथमेश (८) आणि वैष्णवी कृष्णा घोरपडे (६) अशी जलसमाधी मिळालेल्या तिघांची नावे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कृष्णा बाळासाहेब घोरपडे (३०) हे दुचाकीवरुन त्यांचा मुलगा प्रथमेश (८) आणि मुलगी वैष्णवी (६) यांना पंचमीच्या सणासाठी गुरुवारी गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथील मामाकडे घेऊन जात होते. या मार्गावरील चकलांबा, मांडोळ, रसुलाबाद, पौळाची वाडी परिसरात रात्री ८ वाजेच्या सुमारास या भागात जोरदार पाऊस झाल्याने पौळाचीवाडी येथून वाहणाऱ्या अमृता नदीला पूर आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील तिघे वाहून गेले.
मुलीचा मृतदेह सापडला; दोघांचा शोध सुरु
शुक्रवारी सकाळी गावातील नागरिकांना नदीच्या पुलाजवळ दुचाकी दिसली. त्यामुळे वाहून गेल्याचा संशय वाढला. पोलीस, महसूल यंत्रणेला कळवून शोधमोहीम सुरु केली असता नदी पात्रात काही अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला. तर वाहून गेलेल्या दोघांना शोधण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. घटनास्थळी गेवराई, बीड येथील अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. तसेच चकलांबा ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय देशमुख, उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे, तलाठी, मंडळ अधिकारी घटनास्थळी होते. तर गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.