हृदयद्रावक! झोपडीने अचानक पेट घेतला, आजारी अंध वृद्धाचा होरपळून झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:41 PM2023-12-26T17:41:31+5:302023-12-26T17:41:53+5:30
पत्नी शेतात गेल्यानंतर अचानक लागली आग
- संतोष स्वामी
दिंद्रुड (बीड): पत्र्याच्या शेडला अचानक लागलेल्या आगीत आजारी असलेल्या अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी आलापूर येथे घडली. रामभाऊ उत्तमराव शहाणे( ६५ ) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
आलापूर येथे रुक्मीनबाई व रामभाऊ शहाणे हे दाम्पत्य एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत. रुक्मीनबाई सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या. तर अंध असलेले रामभाऊ आजारी असल्याने घरीच होते. दरम्यान, दुपारी अचानक पत्र्याच्या शेडच पुढील भाग पेटला. धुराचे लोट पाहून गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी काही वेळात आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत रामभाऊ शहाणे यांचा धूराने दम कोंडून आणि आगीत होरपळून मृत्यू झाला होता. माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रूड येथील पथक पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सिलेंडरचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली
दरम्यान, गॅस सिलेंडर पत्राच्या शेडमधील स्वयंपाक घरात ठेवलेले होते. आगीचे लोट स्वयंपाक घरापर्यंत पसरण्याच्या आधीच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.