हृदयद्रावक! वॉशिंग मशीनमध्ये खेळणी पडली; वाकून घेताना बुडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 18:10 IST2024-06-17T18:09:27+5:302024-06-17T18:10:25+5:30
खेळत खेळत चिमुकला बाथरूममध्ये गेला असता खेळणी टॉप लोडच्या वॉशिंग मशीनमध्ये पडले

हृदयद्रावक! वॉशिंग मशीनमध्ये खेळणी पडली; वाकून घेताना बुडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू
अंबाजोगाई : येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयसिंग चव्हाण यांचा मुलगा उदयसिंग (वय ५) याचा घरामध्ये खेळताना वॉशिंग मशीनमध्ये बुडून मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अंबाजोगाई येथील हौसिंग सोसायटी परिसरात घडली.
ॲड. चव्हाण हे कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांच्या पत्नी स्वयंपाकात गुंतलेल्या होत्या. यावेळी चिमुकला उदयसिंग खेळत खेळत बाथरूममध्ये गेला. तिथे खेळणी टॉप लोडच्या वॉशिंग मशीनमध्ये पडल्याने स्टूलवर उभा राहून मशीनमध्ये वाकून ती काढण्याच्या प्रयत्नात तो अधिक झुकला आणि मशीनमध्ये डोक्यावर पडला. पाणी असलेल्या मशीनमध्ये त्याचे डोके बुडाल्याने त्याचा कसलाही आवाज बाहेर येऊ शकला नाही.
थोड्या वेळाने उदयसिंग कुठेही दिसत नसल्याने त्याच्या आईने ॲड. जयसिंग यांना बोलावून घेतले. त्यांनी सर्वत्र शोधले असता, त्यांना उदयसिंग वॉशिंग मशीनमध्ये दिसून आला. त्यांनी तातडीने त्यास पाण्याबाहेर काढून लगतच्या खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उदयसिंगचा प्राण वाचू शकला नाही. उदयसिंगच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी शुक्रवारी हातोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.