माजलगावातून हवामान खात्याला पाठविला अर्धा किलो गूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:58 PM2019-05-04T23:58:03+5:302019-05-04T23:59:55+5:30
भारतीय हवामान खात्याने फोनी वादळाच्या संदर्भात व्यक्त केलेला अंदाज आपत्ती व्यवस्थापनासाठी कामी आला. त्याबद्दल हवामान खात्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : भारतीय हवामान खात्याने फोनी वादळाच्या संदर्भात व्यक्त केलेला अंदाज आपत्ती व्यवस्थापनासाठी कामी आला. त्याबद्दल हवामान खात्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर मागील वर्षी चुकीचा अंदाज वर्तविल्याबद्दल हवामान खात्याला दूषणे देत पोलिसात तक्रार देणारे शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभीषण थावरे यांनीही फोनी संदर्भात तंतोतंत अंदाज वर्तविल्याबद्दल हवामान खात्याचे अभिनंदन करीत अर्धा किलो गूळ अधिकाऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी पाठविला आहे.
भारतातील १०० कोटी लोक तसेच शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेती व शेती आधारित उद्योगात काम करतात. दरवर्षी अंदाज चुकल्यामुळे किमान १ हजार शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी देखील हवामान खात्याने फोनी सारखाच तंतोतंत अंदाज वर्तवावा अशी अपेक्षा थावरे यांनी केली आहे.