बीड जिल्ह्यात गारांचा पाऊस; छावण्यांमध्ये धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:02 AM2019-04-05T00:02:15+5:302019-04-05T00:02:38+5:30
मागील दहा दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा तडाखा बसत असताना गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
बीड : मागील दहा दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा तडाखा बसत असताना गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अंबाजोगाई परिसरात गारांचा पाऊस झाला. तर अनेक ठिंकाणी वीज पुरवठा विस्कळीत झाला. वादळी वारे आणि पावसामुळे चारा छावण्यांच्या ठिंकाणी शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी छावण्यांचे निवारा शेड तसेच घरांवरील पत्रे उडाले. आंब्यालाही फटका बसला.
मागील दहा दिवसांपासून तापमानाने चाळिशी ओलांडली होती. अलिकडच्या दोन दिवसात तीव्रता वाढल्याने लोक त्रस्त होते. यातच गुरुवारी सकाळपासून उष्णतेत वाढ झाली मात्र काही तासानंतर पारा घसरत गेला. वादळी वारे, गारांचा तर कुठे सौम्य स्वरुपाचा पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
अंबाजोगाईत गारा पडला
अंबाजोगाई शहरासह तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरु वात झाली. या अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. दुपारी तीन नंतर विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस सुरू झाला. अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या गारपिटीचा फटका शेतीला बसला असून आंबा आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.
लोखंडी सावरगावात तासभर पाऊस
लोखंडी सावरगाव व परिसरात विजेच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्या. तसेच घाटनांदूर, पूस, जवळगाव, बर्दापूर, बनसारोळा भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंब्याचे नुकसान झाले.
केज तालुक्यातील विडा परिसरात वाºयामुळे छावण्यांचे कपडे उडाले, घरांवरील पत्रे उडाले. केज तालुक्यातील कासारी गावात नवनाथ सानप यांच्या कडबा गंजीवर वीज पडून जळत आहे . शिरुर भागात तसेच गेवराई तालुक्यातील तालखेड परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला. मादळमोही येथे वीज पडून सरकीचा फास जळून गेला.
वीज कोसळून बैल ठार
वडवणी तालुक्यातील पुसरा शिवारात गोविंद नानू राठोड हे शेतातील कामे आटोपून बैलांना चारा खाण्यासाठी मोकळे सोडले. गुरु वारी दुपारी बैल चरत असताना अचानक वीज पडल्याने एक बैल जागीच ठार झाला. दुसरा बैल जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच तलाठी भूषण पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व तालुका प्रशासनाला माहिती दिली. या घटनेमुळे राठोड यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
केज, अंबाजोगाईत बत्ती गुल
अवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे अंबाजोगाई परिसरात दुपारी अडीच वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला. तर केज भागात सायंकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला. जिल्ह्यात इतर ठिंकाणीही वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.
छावण्यातील निवारा उघड्यावर
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे अचानक झालेल्या वादळी वाºयामुळे शेतकरी वर्गाने उभारलेल्या अनेक छावण्यांचा निवारा शेड उडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे मुक्या जनावरांचे खूप हाल झाले.
महिलेचा मृत्यू
धारूर तालूक्यात धुनकवड क्र. २ येथे शेतात कापणी करुन टाकलेला कडबा गोळा करताना वीज पडल्याने संदीप काळे याचा भाजून मृत्यू झाला. केज तालुक्यातील तांबवा येथे शेतात काम करताना पाऊस, वाºयामुळे आंब्याच्या झाडाखाली आडोशाला उभी असताना तारामती चाटे नामक महिला वीज पडल्याने ठार झाली.