बीड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस, पाच मंडळात अतिवृष्टी
By शिरीष शिंदे | Published: July 9, 2024 07:49 PM2024-07-09T19:49:06+5:302024-07-09T19:49:13+5:30
पावसामुळे अनेक नद्या पुनर्जीवित झाल्या तर काही नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
बीड: जिल्ह्यात रविवारनंतर सोमवारी मध्यरात्री दमदार पाऊस झाला. त्यामुळे पाच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. सोमवारी दिवसभरात एकूण २२.१ मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी मात्र पावसाने उघडीप दिली होती. मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर होते. वाढल्या पिकांना पावसाची गरज होती.
रविवारनंतर सोमवारी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर मंडळामध्ये १०६. मिमी अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच आष्टी तालुक्यातील आष्टी (७३.४ मिमी), कडा (६८.८ मिमी), धामणगाव (८५.५ मिमी), धानोरा (१०३.५ मिमी) अशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आष्टी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना पाणी आले आहे. पावसाच्या पाण्याच्या अतिवेगामुळे कडी नदीवरील पुलाच्या शेजारी असलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. साेमवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अनेक नद्या पुनर्जीवित झाल्या तर काही नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.