जवळा, नाळवंडी, पिंपळनेर, कवडगावात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:24+5:302021-08-25T04:38:24+5:30

बीड : मागील काही दिवसांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसातील पावसाने दिलासा दिला आहे. मंगळवारी वडवणी तालुक्यातील कवडगाव ...

Heavy rain in Nalawandi, Pimpalner, Kawadgaon | जवळा, नाळवंडी, पिंपळनेर, कवडगावात दमदार पाऊस

जवळा, नाळवंडी, पिंपळनेर, कवडगावात दमदार पाऊस

Next

बीड : मागील काही दिवसांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसातील पावसाने दिलासा दिला आहे. मंगळवारी वडवणी तालुक्यातील कवडगाव मंडळात सर्वाधिक ९८.८ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सात मंडळांमध्ये ४० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन, कापूस तसेच खरिपातील अन्य पिकांना जीवदान मिळाले आहे. आष्टी तालुक्यात मात्र पाऊस प्रमाण कमी असल्याने चिंताजनक स्थिती आहे. कुठे कमी तर कुठे जास्त पावसामुळे अनेक भागात पीक स्थिती वेगवेगळी दिसून येत आहे.

बीड तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. उशिराच्या पावसामुळे मूग, उडीदाला काही प्रमाणात फटका बसला. तर सोयाबीन कोमेजून जात हाेते. मात्र या पावसाने पिकांना बुस्टर डोस मिळाला आहे. सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत बीड, वडवणी, गेवराई तालुक्यात चांगला पाऊस झाला.

सात मंडळात जोरदार

जिल्ह्यातील ७ मंडळांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. बीड तालुक्यातील म्हाळस जवळा मंडळात ६४.३ मिमी, नाळवंडी मंडळात ५६ मिमी, पिंपळनेर मंडळात ५३ तर पाली मंडळात ४५ मिमी पावसाची नोंद झाली. गेवराई तालुक्यात तलवाडा ४५ आणि सिरसदेवी मंडळात ४० मिमी पाऊस झाला. वडवणी मंडळात ५३ मिमी पाऊस नोंदला.

-----

अंबाजाेगाईत सर्वाधिक

बीड तालुक्यात आतापर्यंत ३६४ मिमी, पाटोदा ४१०, आष्टी ३३१, गेवराई ३८६, माजलगाव ५६०, अंबाजोगाई ७०५, केज ४७६, परळी ६६९, धारूर ६१२, वडवणी ५९७ तर शिरूर तालुक्यात ३६२ मिमी पाऊस नोंदला आहे. सर्वाधिक पाऊस अंबाजोगाई तालुक्यात झाल्याचे महावेधचे आकडे सांगतात.

---------

आष्टीत कमी

आष्टी तालुक्यात आष्टी मंडळात आतापर्यंत ३३७, कडा ३४३, टाकळशिंग २५६, दौलावडगाव ३१६, धामणगाव ३१३, धानोरा ३४३ तर पिंपळा मंडळात ४०९ मिमी पाऊस नोंदला आहे. या तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. जून- जुलैमध्ये चांगला पाऊस झाला तरी ऑगस्टमध्ये प्रमाण कमी राहिले आहे. एकूण साधारण पावसाच्या तुलनेत आतापर्यंत ६०.७ टक्केच पाऊस झाला आहे.

----------

Web Title: Heavy rain in Nalawandi, Pimpalner, Kawadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.