अतिवृष्टी ; यंत्रणा हाय अलर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:36+5:302021-09-08T04:40:36+5:30
बीड : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी सुरूच आहे. यामुळे नदी, ओढे, प्रकल्प, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. असाच ...
बीड : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी सुरूच आहे. यामुळे नदी, ओढे, प्रकल्प, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. असाच पाऊस झाला तर, महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याची यंत्रणा सतर्क झाली असून सर्वांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मदतीसाठी गाव, तालुका पातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या आहेत. नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले माजलगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच उर्ध्व कुंडलिका, बिंदुसरा ही धरणेही ओसंडून वाहत आहेत. गावातील तलाव, नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थतीत मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती विभाग सतर्क आहे. तालुकास्तरावरील सर्वच अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देऊन गावपातळीवरील यंत्रणाही सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्यासह काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गोदाकाठच्या ६३ गावांना नोटीस
साधारण १५ वर्षांपूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. तेव्हा गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना धोका पोहचला होता. याचेच सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने केले असता तब्बल ६३ गावांची यादी समोर आली आहे. या सर्वांना नोटीस बजावून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच स्थलांतराबाबतही आदेश दिल्याचे सांगण्यात आले.
वेळप्रसंगी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण
अद्याप जिल्ह्यातील स्थिती शांत आहे. परंतु २०१६ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास शासनाला पत्र पाठवून एनडीआरएफ पथकाला बोलावले जाणार आहे. सध्या जिल्ह्यात एकाही ठिकाणी पूरस्थितीजन्य परिस्थितीचा अहवाल आपत्ती विभागाकडे आलेला नाही.
ग्रामसेवकांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मदतीला
तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. या स्थितीत मदत करण्यासाठी गावातील ग्रामसेवकांपासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गावातील लोकांनी अडचण असल्यास ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार अथवा पोलिसांना संपर्क साधावा. त्यांनी मदत न केल्यास २२२६०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. नियंत्रण कक्षात २४ तास यंत्रणा सतर्क राहून मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
--
गोदाकाठच्या ६३ गावांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच चार दिवसांपूर्वीच सर्वच यंत्रणेला हाय अलर्ट केले आहे. अडचणीत मदतीसाठी गावपातळीपासून ते जिल्ह्यापर्यंत नियंत्रण कक्ष तयार केले आहेत. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्यासह २२२६०४ हा क्रमांक नियंत्रण कक्षात २४ तास मदतीसाठी सेवेत आहे.
उमेश शिरके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बीड