९७ दिवसांत पावसाची जोरदार बॅटिंग, बीड जिल्ह्यात सरासरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:02+5:302021-09-06T04:38:02+5:30
बीड : जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने चिंता मिटविली असून, ९७ दिवसांत ...
बीड : जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने चिंता मिटविली असून, ९७ दिवसांत जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मोसमातील पुढील २५ दिवसांत होणारे संभाव्य पाऊसप्रमाण बोनस ठरणार आहे. बीड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५६६.१ मिमी इतके आहे. जून ते ५ सप्टेंबरपर्यंत ९७ दिवसांत ६५४ मिमी पाऊस नोंदला आहे. पावसाळ्याचे आणखी २५ दिवस, तसेच ऑक्टाेबरमधील परतीच्या पावसाचा अनुभव पाहता, पाण्याच्या बाबतीत समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, ३० व ३१ ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मुसळधारेने पिकांचे कमालीचे नुकसान केले आहे.
२४ तासांत पाऊस कुठे किती
५ सप्टेंबर रोजी मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ६९.६ मिमी पावसाची नोंद झाली. बीड तालुक्यात ७७.७ मिमी, पाटोदा ८४.९, आष्टी ७८.३, गेवराई १२९.४, माजलगाव १०.९, अंबेजोगाई ६७.४, केज ५९.८, परळी ४.१, धारूर १६.८, वडवणी २२.४ आणि शिरुर तालुक्यात १३८ मिमी पाऊस नोंदला.
३३ मंडळात अतिवृष्टीची नोंद
बीड तालुक्यात बीड मंडळात ८०.३ मिमी, पाली ९४, म्हाळस जवळा ८२, नाळवंडी ८५, राजुरी नवगण ११०, पिंपळनेर ७५, पेंडगाव ८९.५ आणि नेकनूर मंडळात ९० मिमी पाऊस झाला. पाटोदा तालुक्यातील थेरला मंडळात ९४, तर अंमळनेरमध्ये १४५ मिमी पाऊस नोंदला आहे. आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळात ६८, कडा १२१.५, दौला वडगाव ७०, धामणगाव ११२ मिमी आणि पिंपळा मंडळात ७५ मिमी पाऊस झाला.
अंबेजोगाई तालुक्यात पाटोदा ममदापूर मंडळात ८८ आणि बर्दापूर मंडळात ११७.८ मिमी पाऊस नोंदला. केज तालुक्यात केज मंडळात ७७.५, विडा ७३.८, नांदुरघाट मंडळात १०८ मिमी पाऊस झाला. शिरुर कासार तालुक्यात शिरुर मंडळात ९८, रायमोहा येथे १५९ तर तिंतरवणी मंडळात १५५ मिमी पाऊस नोंदला आहे.
गेवराई तालुक्यात सर्व दहा मंडळांत अतिवृष्टी
४ सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील सर्व दहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झली. गेवराई मंडळात १२३, मादळमोही १७९, जातेगाव १२१.८, पाचेगाव १०५, धोंडराई ७८.८, उमापूर १३४.८, चकलांबा १४९.३, सिरसदेवी ११४, रेवकी १३८ आणि तलवाडा मंडळात १४९ मिमी पाऊस नोंदला आहे.
----