अंबाजोगाईत जोरदार पावसाने झाले पाणीपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:15+5:302021-08-24T04:38:15+5:30
अनेक रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुक ठप्प अंबाजोगाई : शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने शहरात सर्वत्र पाणीपाणी झाले. पावसाचे ...
अनेक रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुक ठप्प
अंबाजोगाई : शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने शहरात सर्वत्र पाणीपाणी झाले. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साठल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहरात सायंकाळी ४.३० नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक पावसाचा जोर वाढल्याने शहरात १५ ते २० मिनिटांत पाणीपाणी झाले. शहरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्यातच पुन्हा हा पाऊस वाढत राहिल्याने नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले. शहरातील कुत्तरविहीर परिसरात खोलेश्वर विद्यालयासमोर तीन फुटापर्यंत पाणी वाहू लागल्याने या परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने पाण्याच्या डोहातच अनेक वाहने बंद पडली. भरपावसात अनेकांना चिंब भिजत आपले वाहन ढकलत पाण्याबाहेर काढण्याची कसरत करावी लागली. सोमवारी दुपारी एक तास झालेल्या या पावसामुळे जयवंती नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तसेच शहरातील रविवारपेठेतही रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. ज्यांची दुकाने व घरे रस्त्यालगत आहेत, अशा अनेक घर व दुकानांमध्ये पाणी शिरले. मोठ्या नाल्यांमध्ये कचरा साठल्यानेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. एकंदरीत तासभर झालेल्या पावसाने अंबाजोगाई शहरात पाणीपाणी केले.
230821\20210823_171227.jpg
रस्त्यावर साठलेले पाणी