बीड जिल्ह्यात दमदार पाऊस; सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:40 AM2020-07-24T11:40:20+5:302020-07-24T11:40:45+5:30
धारूर शहराजवळ अंबाचौंडी नदीला तसेच घागरवाडा नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांना दोन तास ताटकळावे लागले.
बीड : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत मागील 24 तासात बीड, आष्टी, शिरूर आणि धारूर या चार तालुक्यांतील एकूण सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच आष्टी तालुक्यात मागील 24 तासात 65 मिमी सरासरी पाऊस झाला.
गुरुवारी दुपारी जिल्ह्यातील केज, धारुर, वडवणी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या तर नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून खरीप पिकांना चांगला फायदा होणार आहे. कुंडलिक प्रकल्पाचे तीन दरवाजे गुरुवारी रात्री उघडण्यात आले.
धारूर शहर व तालुक्यात गुरूवारी दुपारी दमदार पावसामुळे सर्व नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत होते. तालूक्यातील चोरांबा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने चारदरी व ढगेवाडीचा रस्ता तीन तास बंद होता. तर धारूर शहराजवळ अंबाचौंडी नदीला तसेच घागरवाडा नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांना दोन तास ताटकळावे लागले.
दरम्यान दुपारी चारच्या सुमारास वडवणी शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू झाला. केज तालुक्यातील बनसारोळा, येवता, आपेगाव परिसरातही दोन ते तीन तास पावसाने दमदार हजेरी लावली. तर कोरेगाव येथील नदी दुथडी भरुन वाहत होती. गेवराईसह शिरसदेवी आणि अन्य गावांत चांगला पाऊस झाला. बीडमध्ये सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या.
आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी व परिसरात पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. तालुक्यातील ब्रह्मगाव, आष्टी, पोखरी, मुर्शदपूर, कºहेवाडी, करंजी भागामध्ये चांगला पाऊस झाल्याचे वृत्त आहे. शिरुर कासार येथे रात्री ८ वाजेपासून १० वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. माजलगाव धरणाच्या पाणीपातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.