दुचाकीचोरांचा बीड जिल्ह्यात हैदोस; महिन्याभरात २० दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:50 PM2018-05-07T12:50:54+5:302018-05-07T12:50:54+5:30
चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांपाठोपाठ आता दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल २० दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
बीड : चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांपाठोपाठ आता दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल २० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुचाकी चोरांची टोळीच सक्रिय असल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून या टोळीच्या मुसक्या आवळून जनतेचा विश्वास जिंकणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांकडून महिनाभरापासून एकही मोठी कारवाई झालेली नाही. त्यामुळेच चोरटे जिल्ह्यात सक्रिय होत चालले आहेत. बीड शहरातील साठे चौकातून पाच लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करणे, गेवराई तालुक्यातील धोंडराई परिसरातील वस्तीवरील दरोडा, कडा येथील शेत वस्तीवरील दरोडा, बीड शहरातील दिवसाढवळ्या झालेल्या चोऱ्या ही याची ज्वलंत उदाहरणे आहेत. एवढ्या घटना घडूनही पोलिसांना अद्याप याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यातच मागील महिनाभरापासून विविध ठिकाणी लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. परळी शहरातील थर्मल गेटसमोरुन ३० एप्रिल रोजी मोतीराम संपती चाटे यांची दुचाकी चोरीला गेली. त्यानंतर अंबाजोगाई शहरातून कृष्णा धन्वे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास केली. धारुर येथील नगर पालिकेसमोरुन स्वप्नील धनवडे यांची नवी कोरी दुचाकी चोरट्यांनी पळवली. एक मे रोजी सिरसाळा येथील इदगाह मस्जिदसमोरुन नदीम खलील कुरेशी या तरुणाची दुचाकी चोरीला गेली. २७ एप्रिल रोजी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील संचारेश्वर विद्यालयासमोरुन अनंता खाटीक या शेतकऱ्याची दुचाकी चोरट्यांनी पळविली. अशा अनेक घटना मागील महिनाभरापासून जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुचाकी चोरींची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. चोरी गेलेल्या दुचाकी शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांनीच घ्यावी वाहनाची काळजी
कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक कुठेही दुचाकी पार्किंग करतात. हँडल लॉक करुन आपले काम करुन येतात. परत आल्यानंतर दुचाकी चोरीस गेल्याचे आढळते. त्यामुळे नागरिक हँडल लॉक केले म्हणजे सुरक्षितता आहे असे न समजता आपल्या वाहनांकडे दुरुन का होईना लक्ष ठेवावे, सिक्युरिटी सेन्सरचा वापर करवा तसेच शक्यतो सीसीटीव्हीच्या निगराणीखाली वाहने ठेवावीत. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
दोन महिन्यांपूर्वी पकडली टोळी
दोन महिन्यांपूर्वी गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील एक टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली होती. त्यांच्याकडून १२ दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यानंतर केज परिसरातून एक टोळी जेरबंद केली होती. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. माजलगाव येथे कवडगाव परिसरातील दुचाकी चोरांना पकडण्यात आले. यानंतर मात्र एकही कारवाई झाली नसल्याचे दिसून येते.
पथके काम करीत आहेत
घडलेल्या घटनांचे तपास लावणे सुरु आहेत. काही संशयित असून, त्यांना लवकरच ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल. सर्व चोऱ्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण केला जाईल. नागरिकांनीही काळजी घ्यावी. चोरी गेलेल्या दुचाकी परत मिळवून देण्यासाठी व चोरट्यांना बेड्या ठोकण्यासाठी आमची पथके काम करीत आहेत.
- घनश्याम पाळवदे, पो. नि., स्थानिक गुन्हे शाखा, बीड