बाधितांचा उच्चांक; १२११ नवे रूग्ण तर तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:55+5:302021-04-18T04:33:55+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी पुन्हा एकदा नव्या रूग्णांच्या संख्येने उच्चांक पार केला. दिवसभरात १२११ ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी पुन्हा एकदा नव्या रूग्णांच्या संख्येने उच्चांक पार केला. दिवसभरात १२११ नवे रूग्ण आढळले तर तिघांचा मृत्यू झाला. तसेच ६८१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४ हजार २६२ जणांची चाचणी केली. यामध्ये ३ हजार ५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर १ हजार २११ नवे रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाईत सर्वाधिक ३३७ रुग्ण आढळून आले तर, आष्टीत ११९, बीडमध्ये १४३, धारुरमध्ये ४७, गेवराईत ३९, केजमध्ये ११२, माजलगाव ६५, परळीत १३८, पाटोदा ९९, शिरुरमध्ये ५३, वडवणी ५९ रुग्ण आढळून आले.
दरम्यान, तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यामध्ये बीड शहरातील भाजी मंडई परिसरातील ७० वर्षीय महिला, केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील ७० वर्षीय पुरुष आणि आष्टी तालुक्यातील बोरवडी येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. शनिवारी दिवसभरात ६८१ जणांनी कोरोनावर मात केली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३८ हजार १६८ इतकी झाली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३३ हजार १८ इतकी झाली आहे. आतापर्यंत ७४१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जि.प.सीइओ अजित कुंभार, डीएचओ डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.