विजेच्या लपंडावाने आंबेवडगावात पिके करपू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:52+5:302021-01-23T04:34:52+5:30
धारूर : तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागात रब्बीची पिके चांगली असताना योग्यवेळी पाणी मिळत नसल्याने शेतीतील रब्बीची हातची पिके ...
धारूर
: तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागात रब्बीची पिके चांगली असताना योग्यवेळी पाणी मिळत नसल्याने शेतीतील रब्बीची हातची पिके जागेवर वाळू लागल्याने आंबेवडगाव परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील आंबेवडगाव ३३ के. व्ही. सबस्टेशनवरून विद्युत पुरवठ्यात विस्कळीतपणा आल्याने दिवसाकाठी दोन गुंठे पिकाला पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती. परंतु आता विजेच्या लपंडावामुळे पाणी उपलब्ध असूनही त्याचा फायदा होत नसल्याची स्थिती आहे. शेतातील उभी पिके पाण्यावाचून डोळ्यादेखत करपत आहे. याला वीज वितरणचा कारभार जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत असून आंदोलनाचा इशारा अक्षय घोळवे यांनी दिला आहे.
तांत्रिक अडचणींमुळे विजेचा प्रश्न
सध्या विजेची मागणी वाढली आहे. दाब वाढल्यामुळे १३२ के.व्ही. तेलगाव येथून वीजपुरवठा होणाऱ्या तारा तुटू लागल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा बंद करावा लागत आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल असे सहायक कार्यकारी अभियंता कुणाल पेन्सिलवार यांनी सांगितले.