वराह चोरीच्या कारणावरुन बीडच्या महिलेस वडवणीत ठेवले डांबून; ९ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:12 AM2019-06-15T00:12:33+5:302019-06-15T00:13:07+5:30
शहरातील बसस्थानकाच्या मागे राहणाऱ्या शिकलककर कुटुंबातील मुलाने वडवणी येथे वराह चोरी केल्याच्या संशयावरुन, त्याच्य आईचे अपहरण करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी शहरातील बसस्थानकामागे उघडकीस आली.
बीड : शहरातील बसस्थानकाच्या मागे राहणाऱ्या शिकलककर कुटुंबातील मुलाने वडवणी येथे वराह चोरी केल्याच्या संशयावरुन, त्याच्य आईचे अपहरण करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी शहरातील बसस्थानकामागे उघडकीस आली. मारहाणीत महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अपहरण केलेल्या महिला राधा हिराचंद शिकलकरी राहणार बीड बसस्थानकाच्या मागे. त्यांच्या मुलाने वडवणी येथे वराह चोरल्याचा संयश त्यांच्या नात्यातीलच रणवीरसिंग माणिकसिंग टाक व इतरांना होता. या कारणावरुन ११ जून रोजी पहाटे २ वाजता पालासमोर झोपलेल्या राधा शिकलकरी यांचे ९ जणांनी चारचाकीच्या सहाय्याने अपहरण केले. त्यानंतर त्यांना वडवणी येथे नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. यात राधा यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, राधा यांचे पती व इतर नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला तेव्हा त्यांना वडवणी शिवारात डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. तीन दिवसांपूर्वी नातेवाईकांनी तेथे जाऊन राधा यांची सुटका करुन आणली. त्यानंतर राधा यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
शुक्रवारी राधा शिकलकरी यांच्या फियार्दीवरुन रणवीरसिंग नानकसिंग टाक, कृष्णा नानकसिंग टाक, सूरज नानकसिंग टाक, विजूसिंग मनोहरसिंग टाक, मोहबतसिंग चंदूसिंग टाक, कृष्णा गुरुसिंग टाक, सूरजसिंग टाक, लांडूकर नम्मतसिंग टाक, शरबत कौर नानकसिंग टाक (सर्व रा. वडवणी) या ९ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार हरिश्चंद्र गिरी करत आहेत.
पायाला प्लॅस्टर केलेल्या अवस्थेत महिला पोलीस अधिक्षक कार्यालयात
अपहरण झालेल्या राधा शिकलकर यांचा मारहाणीत पाय मोडला होता. त्यांच्या पायाला प्लास्टर करण्यात आले होते.
गुन्हा नोंद करुन घेतला जात नाही यामुळे शुक्रवारी राधा यांचे कुटुंब त्यांना पाय मोडलेल्या अवस्थेमध्ये पोलीस अधिक्षक कार्यालयात घेऊन आले होते.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्याशी नातेवाईकांनी चर्चा केली व आपले म्हणणे मांडले.
त्यानंतर त्यांनी गुन्हा नोंद करुन घेण्यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
भास्कर सावंत यांच्या सांगण्यावरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी महिलेसह कुटुंब आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला.