हतबल शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतात सोडली मेंढरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:24+5:302021-05-13T04:33:24+5:30
विजयकुमार गाडेकर शिरूर कासार : लाॅकडाऊनमुळे बाजार बंद, माल विक्रीसाठी अडसर, भाव मिळेना आणि खर्चही निघेना, तोटा किती सहन ...
विजयकुमार गाडेकर
शिरूर कासार : लाॅकडाऊनमुळे बाजार बंद, माल विक्रीसाठी अडसर, भाव मिळेना आणि खर्चही निघेना, तोटा किती सहन करायचा? म्हणून गोमळवाडा येथील राजेंद्र मेरड या शेतकऱ्याने फळे काढण्याऐवजी टोमॅटोच्या शेतात मेंढरं सोडून मुक्या जीवांची भूक भागविली.
तालुक्यात कोरोनामुळे शेती आणि शेतकऱ्यांची द्विधा अवस्था झाली. पाणी भरपूर उपलब्ध असल्याने भाजीपाला पीक घेतले. मात्र, कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे टोमॅटो शेतीत मेंढर सोडण्याची दुर्दैवी वेळ गोमळवाड्यातील शेतकऱ्यावर आली.
गोमळवाडा येथील राजेंद्र मेरड या शेतकऱ्याने थेट पंढरपूर येथून सुधारित जातीचे टोमॅटोची प्रति तीन रुपये प्रमाणे ३३०० रोपे आणली. त्याची ३२ गुंठ्यावर लागवड केली. मल्चिंग, ठिबकची व्यवस्थाही केली. खतांची मात्रा आणि औषधी वेळच्या वेळी फवारणी केली. परिणामी, टोमॅटो शेतीला लालभडक रंग चढला, मातीची बाधा होऊ नये म्हणून त्याची बांधणीदेखील केली होती. आता विक्रीतून चांगली कमाई होईल, असा विश्वास वाटत असतानाच लाॅकडाऊन जाहीर झाले आणि कमाई तर सोडाच; पण तोडणी आणि वाहतुकीचाही खर्च निघणे मुश्कील झाल्याने मेंढरं सोडण्याचा निर्णय जड अंतःकरणाने घेतला. जिवापाड जोपासना केलेली टोमॅटो शेती मेंढराच्या पायदळी तुडवली. हृदयाला पीळ पडणारे हे दृश्य डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेले.
रस्ते बंद, बाजार बंदमुळे शेत केले मोकळे
फेब्रुवारीत लागवड केली होती. बाजारात पाच रुपये किलोनेदेखील कुणी घेईना. हाॅटेल, खाणावळी आणि मोठ्या शहराचे रस्ते बंद आहेत. तोडणी मजुरी आणि वाहतुकीला भाडे हे विक्री दामापेक्षा अधिक म्हणून पदरमोड करण्याऐवजी शेतात मेंढरं सोडून पुढचा मार्ग मोकळा केल्याचे राजेंद्र मेरड यांनी सांगितले.
तोट्याची शेती
हिशेब सांगताना एक दिवसभरात दहा मजूर पन्नास किलो माल तोडायचा. दहा मजुरांची मजुरी तीनशे प्रमाणे तीन हजार तर वाहतुकीला २५०० असा खर्च ५५०० आणि विक्रीतून हाती यायचे २५०० ते ३०००. हा तोटा नको म्हणून शेत मोकळे करण्यासाठी मेंढरं सोडल्याचे शेतकरी म्हणाला.
===Photopath===
120521\12bed_2_12052021_14.jpg~120521\12bed_1_12052021_14.jpg