हतबलता ! 'या' गावाला अजूनही रस्ता नाही; प्रसूतीसाठी महिलेचा बैलगाडीतून प्रवास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:45 PM2020-10-16T12:45:20+5:302020-10-16T12:51:08+5:30
Beed News जळगाव मजरा या गावाला रस्ता नसल्याने गावकऱ्यांना त्रास होताना दिसत आहे.
गेवराई/तलवाडा : प्रसूती कळा येऊ लागल्यानंतर वाहनातून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात घेऊन जातात. मात्र, गेवराई तालुक्यातील जळगाव मजरा गावाला स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत रस्ताच झालेला नसल्यामुळे गर्भवतीला प्रसूतीसाठी चक्क बैलागाडीतून घेऊन जावे लागल्याची घटना घडली आहे.
रस्ता ही विकासाची वाहिनी समजली जाते. अनेक गावांना पक्के रस्ते नाहीत. जळगाव मजरा या गावाला रस्ता नसल्याने गावकऱ्यांना त्रास होताना दिसत आहे. अंबेसावळी येथे सासर असलेली विवाहिता अर्चना गुंदेकर माहेरी जळगाव मजरा येथे बाळंतपणासाठी आलेली होती. बुधवारी त्यांना प्रसववेदना होत असल्याने दवाखान्यात नेण्याचे ठरले. पण पावसामुळे रस्त्यावर चिखल असल्याने कच्च्या रस्त्यावरून वाहन येणे शक्य नव्हते. रुईपर्यंत कच्च्या रस्ता असल्यामुळे २ कि.मी. अंतर बैलगाडीतून प्रवास करावा लागल्याने गर्भवती महिलेला प्रचंड त्रास भोगावा लागला.
शेडमध्ये झोपेलेल्या चिमुकलीचे मध्यरात्री अपहरण
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 16, 2020
https://t.co/Rmi8ACmCeD
तालुक्यातील कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गापासून जवळच आणि रुई धानोराच्यामध्ये असलेल्या जळगाव मजरा या गावाची लोकसंख्या २ हजारांच्या जवळपास आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावाला जाण्यासाठी कच्चा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात गावात येण्या-जाण्या साठी रस्ता रहात नाही. रस्त्यावर नुसता चिखल व पाणी साचते. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे ९ किलोमीटर अंतर कापून निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. या महिलेला प्रसुती कळा येऊ लागल्याने व गावात कोणतीच गाडी येत नसल्याने तिला बैलगाडीतून चिखल तुडवीत दोन किलोमीटर अंतरावरील रुई गावापर्यंत आणले. तेथून अॅपे रिक्षाने थेट बीड येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रसूती करण्यात आली. प्रशासन व लोकप्रतिनिधीने या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्ता चांगला चांगला करावा, अशी मागणी गावातील नागरिक महारुद्र खुणे, महादेव बोबडे, गोविंद खूणे, बबन ईदगे, मधुसूदन खुणे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.