औषधांसाठीची हेल्पलाईनच ‘डेड’; ७०० तक्रारी; एकीचीही दखल नाही
By सोमनाथ खताळ | Published: October 7, 2023 05:19 AM2023-10-07T05:19:08+5:302023-10-07T05:19:25+5:30
सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली.
सोमनाथ खताळ
बीड : सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली. जर असे केले नाही तर १०४ क्रमांकावर तक्रारी करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
म्हटले होते. स्वातंत्र्य दिनापासून आतापर्यंत ७०० तक्रारी टोल फ्री क्रमांकावर आल्या आहेत. याची कसलीही दखल घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. रुग्णांना खासगी मेडिकलमधूनच औषध खरेदी करावी लागत आहेत.
१५ ऑगस्टपासून सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये औषध-गोळ्यांसह तपासणी व उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांपुढे रांगा लागत आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांपैकी मोजक्याच गोळ्या सरकारी दवाखान्यात मिळत आहेत. इतर औषधे खासगीतून विकत घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत.
‘लोकमत’ने काय पाहिले...
बीड जिल्हा रुग्णालयात २९ ऑगस्ट रोजी तरुणीचे पोट दुखत असल्याने तपासणी करण्यात आली. त्यात २ गोळ्या तिला दिल्या. इतर दोन नाहीत असे सांगण्यात आले. म्हणून तिच्या नातेवाइकांनी १०४ क्रमांकावर कॉल केला. परंतु, अद्यापही याची कसलीही दखल घेतलेली नाही. ऑक्टोबरमध्ये याची विचारणा केल्यावर अद्याप माहिती मिळाली नाही, असे सांगण्यात आले.
बीड रुग्णालयातच ऑक्टोबरमध्ये एका तरुणाला पाच प्रकारची औषधे दिली. यातील दोन मिळाली तर तीन मिळाली नाहीत. याचीही तक्रार १०४ वर केली. परंतु, त्याचीही कसलीच दखल घेतली नाही.
१०४ टोल फ्री क्रमांक नावालाच
औषधे मिळत नाहीत म्हणून १०४ या टोल फ्रीवर तक्रारी करण्यास सांगितले, परंतु त्या तक्रारी निकाली निघाल्या का? याचा कसलाही आढावा घेतला जात नाही. केवळ टोल फ्री क्रमांक देऊन शासन हात झटकत आहे.