ग्राहकांना खूश करत नाही म्हणून नर्तिकेला डांबून तिच्या १२ वर्षांच्या मुलीला केले गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 02:39 PM2022-06-14T14:39:35+5:302022-06-14T14:45:07+5:30
नकार दिल्याने लाठी-काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अंधाऱ्या खोलीत रात्रभर डांबून ठेवले.
बीड : पतीने वाऱ्यावर सोडल्याने दोन मुलींना जगविण्यासाठी तिने कला केंद्राची वाट धरली. ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कोणाची...’ म्हणत ती दोन मुलींकडे पाहून जीवन कंठत होती. मात्र, पाय दुखत असल्याने एके दिवशी नाचण्यास नकार दिला. ग्राहकांना खूश करत नाही म्हणून केंद्रचालकांनी तिला डांबले. त्यानंतर तिच्या १२ वर्षीय मुलीला गायब केले. हा धक्कादायक प्रकार मांजरसुंबाजवळ (ता. बीड) येथे १३ जून रोजी उघडकीस आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मूळची सेलू (जि. परभणी) येथील ३० वर्षीय सीमा (नाव बदललेले) पाच वर्षांपूर्वी मांजरसुंबा येथील कला केंद्रात दाखल झाली. तिला पतीने सात वर्षांपूर्वी सोडून दिलेले आहे. पदरात दोन चिमुकल्या मुली असल्याने नाईलाज म्हणून तिने कला केंद्राची पायरी चढावी लागली. दरम्यान, १ जून रोजी रात्री ८ वाजता पाय दुखू लागल्याने तिने नाचण्यास नकार दिला. यावेळी नाचत नसल्याने व ग्राहकाला खूश करत नसल्याने कला केंद्र चालविणारी भाभी परभणीकर व तिचा भागीदार राजू ऊर्फ समीर खाटीकवाला (रा. नेकनूर, ता. बीड) यांनी लाठी-काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राजू खाटीकवाला याने वायरने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अंधाऱ्या खोलीत रात्रभर डांबून ठेवले. पाच वर्षांपासून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचा सीमाचा गंभीर आरोप आहे.
ट्रकमधून गाठले जालना
दरम्यान, राजू खाटीकवाला याची नजर चुकवून २ जून रोजी पहाटे सीमाने कला केंद्रातील अंधाऱ्या खोलीतून पळ काढला. ट्रकमधून तिने जालना गाठले. तेथून ती सेलूला गेली. गळ्यातील दागिने गहाण ठेवून ती दोन दिवसांनी बीडला परतली.
पोलिसांनी तक्रार घेतली नाही
दरम्यान, सीमाने बीडला आल्यावर शहर ठाणे, शिवाजीनगर ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. मात्र, तिची तक्रार घेतली नाही. पाठीवर मारहाणीचे व्रण दाखवूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा सीमाचा आरोप आहे. १३ जून रोजी सीमाने पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून १२ वर्षीय मुलीला त्या दोघांच्या तावडीतून सोडावे, पाच वर्षांपासून केलेल्या अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
संबंधित महिलेने नेकनूर ठाण्यात अद्याप तक्रार दिलेली नाही. असा काही प्रकार घडला असेल तर माहिती घेतो. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- शेख मुस्तफा, सहायक निरीक्षक, नेकनूर ठाणे