...इथे उमेदवारांनी घेतल्या शाळेत प्रचार सभा, विद्यार्थ्यांना दिली भरघोस आश्वासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:44 PM2017-09-01T16:44:42+5:302017-09-01T16:50:32+5:30
सकाळी 9 वाजताची वेळ शाळेच्या समोर विद्यार्थ्यांनी रांग लावलेली. तसे हे सर्वसामान्य चित्र परंतु वेगळेपण असे की, यावेळी विद्यार्थ्यांची लावलेली रांग ही राष्ट्रगीतासाठी नव्हे तर मतदानासाठी होती. विद्यार्थ्यांना लोकशाही मुल्यांची माहिती व्हावी, मतदान प्रक्रियेचा अनुभव यावा, आपल्या मतदानाच्या मुलभूत हक्काची जाणीव व्हावी या उद्देशाने आमेना उर्दु हायस्कुल ने विदयार्थी प्रतिनिधी निवडीसाठी हि निवडणुक राबवली.
माजलगाव ( बीड ), दि. 1 : सकाळी 9 वाजताची वेळ शाळेच्या समोर विद्यार्थ्यांनी रांग लावलेली. तसे हे सर्वसामान्य चित्र परंतु वेगळेपण असे की, यावेळी विद्यार्थ्यांची लावलेली रांग ही राष्ट्रगीतासाठी नव्हे तर मतदानासाठी होती. विद्यार्थ्यांना लोकशाही मुल्यांची माहिती व्हावी, मतदान प्रक्रियेचा अनुभव यावा, आपल्या मतदानाच्या मुलभूत हक्काची जाणीव व्हावी या उद्देशाने आमेना उर्दु हायस्कुल ने विदयार्थी प्रतिनिधी निवडीसाठी हि निवडणुक राबवली. प्रतिनिधी निवडीच्या या प्रक्रिये बाबत विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये प्रचंड कुतुहल दाखवून उत्साहाने सहभाग घेतला.
शहरातील जुन्या मोंढा भागात आमेना उर्दु हायस्कुल हि इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंतची शाळा आहे. या शाळेचे वैशिष्ठय म्हणजे येथील विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या ही केवळ 60 आहे तर मुलींची संख्या ही तब्बल 100 वर आहे. शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी निवड करताना यावेळी अनोखी पद्धत वापरत खुल्या निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात आले. लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेचे महत्व,आपले मुलभुत अधिकार कसे वापरावेत व निवडणुक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव विदयार्थ्यांना यावा हा या मागे उद्देश होता.
याच अनुशंगाने सर्व नियोजन झाले. यानुसार आठ दिवसांपासुन शाळेमध्ये निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत होती. सर्वसाधारण निवडणुकीच्या वेळी ज्याप्रमाणे मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येतात त्या प्रमाणे विद्याथ्र्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर निवडणुक अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली यात जवळपास 12 विद्यार्थ्यांनी निवडणुक अर्ज भरले.अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत 5 उमेदवार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज मागे घेतले. यांनतर शाळा प्रशासनाकडुन उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली.
...आणि प्रचाराच्या फेरी झडल्या
पुढच्या टप्प्यात निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला. प्रचार कशा पध्दतीने करण्यात येतो याचेही प्रशिक्षण यावेळी विद्यार्थ्यांन देण्यात आले. प्रचारादरम्यान उमेदवारानी विद्यार्थ्यांना,मी शाळेसाठी नेमके काय करणार आहे याची मांडणी केली. मला आपण कशासाठी मतदान करावे हे समजुन सांगीतले. शाळेची स्वच्छता, पाण्याचे पाणी , विजेची समस्या या समस्यांवर बोट ठेवत या आपण दूर करू असे आश्वासन दिले.
100 टक्के झाले मतदान
7 उमेदवारांमध्ये 4 उमेदवार मुली होत्या. आज सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.यात 100 टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले. मतदान संपल्यानंतर याच ठिकाणी मतमोजणी करुन निकाल जाहिर करण्यात आला. चुरशीच्या या निवडणुकीत आदेबा पठाण ही 24 मते घेवून निवडुन आली. निवडणुकीत सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सक्रीय सहभाग घेतला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जफर सिददीकी, मुन्तेजा ईनामदार आदी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते नासेर खान पठाण यांनी प्रयत्न केले.
शाळेची स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि माझ्या मित्र-मैत्रीणीना शिक्षणात येणा-या अडचणी दूर करण्यास मी प्राधान्य देईल. सर्वांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेल.
-आदेबा पठाण, विजयी उमेदवार