झुडपात लपवलेले खंजीर, गुप्ती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:19 AM2018-12-28T00:19:48+5:302018-12-28T00:20:18+5:30
सुमित वाघमारे या युवकाचा खून करण्यासाठी वापरलेले खंजीर व गुप्ती ही दोन्ही हत्यारे गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील जिरेवाडी परिसरात जप्त करण्यात आली आहेत. ही हत्यारे एका झुडपात लपवून ठेवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सुमित वाघमारे या युवकाचा खून करण्यासाठी वापरलेले खंजीर व गुप्ती ही दोन्ही हत्यारे गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील जिरेवाडी परिसरात जप्त करण्यात आली आहेत. ही हत्यारे एका झुडपात लपवून ठेवली होती. गुरुवारी सकाळपासूनच पेठबीड पोलीस खुनाच्या तपासासाठी बाहेर पडले होते. विशेष म्हणजे हा तपास मोठ्या बंदोबस्तात केला जात आहे.
१९ डिसेंबर रोजी सुमित वाघमारे या युवकाचा प्रेमप्रकरणातून पत्नी भाग्यश्रीच्या समोरच बालाजी लांडगे व संकेत वाघ यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. तसेच त्यांना कृष्णा व गजानन क्षीरसागर यांनी सहकार्य केल्याचे निष्पन्न होताच, त्यांना अटक केली होती. हे सर्व जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. याप्रकरणाचा तपास पेठबीड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत हे करीत आहेत.
सुमितचा काटा काढण्यासाठी वापरलेली हत्यारे, वाहने जप्त करण्यासाठी गुरूवारी सकाळीच पेठबीड पोलीस बाहेर पडले. दुपारच्या सुमारास जिरेवाडी शिवारात एका झुडपात लपवून ठेवलेले खंजीर व गुप्ती पोलिसांच्या हाती लागले. ते जप्त करण्यात आलेले आहे. तसेच वाहने जप्त करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पेठबीड पोलीस तपासासाठी बाहेरच होते, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
हा तपास पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेठबीड ठाण्याचे सपोनि पंकज उदावंत हे करीत आहेत. त्यांच्यासोबत सुनील अलगट, किशोर जाधव, अनिल शेळके, महेंद्र ओव्हाळ, महेंद्र साळवे, कृष्णा बडे, शशिकांत जाधव, भगवान खाडे हे कर्मचारीही तपासकामी मदत करीत आहेत.
हत्यार लपविल्यानंतर गजानन फरार
बालाजी व संकेतने सुमितला संपविल्यानंतर कार अयोध्यानगरात सोडली. त्यानंतर त्यांना सोबत घेऊन गजानन क्षीरसागर हा गेवराईच्या दिशेने गेला. जिरेवाडी शिवारात गजाननने दुचाकी थांबविली. बालाजी जवळील खंजिर व गुप्ती ताब्यात घेत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झुडपात लपवून ठेवली. कोणाला दिसणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली होती. त्यानंतरच गजाननने दोघांच्या हाती दुचाकी सोपवित तो बीडला परतला होता, असे पोलीस सूत्रांकडून समजते. गुरूवारी दुपारी हे दोन्ही हत्यारे पोलिसांनी जप्त केले आहेत.