लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:59 AM2019-01-04T00:59:35+5:302019-01-04T00:59:42+5:30
जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आष्टी तालुक्यातील वाहिरा सज्जाचे तलाठी राजेंद्र वाघ व त्यांचा मदतनीस आशिष जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आष्टी तालुक्यातील वाहिरा सज्जाचे तलाठी राजेंद्र वाघ व त्यांचा मदतनीस आशिष जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई कडा येथे गुरूवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
वाहिराचे तलाठी राजेंद्र जाधव यांच्याकडे जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्याची मागणी तक्रारदार करीत होते. यावेळी जाधव यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच मदतनीस आशिष जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने तात्काळ बीड एसीबी कार्यालय गाठले. बुधवारी रीतसर तक्रार दिली. त्याप्रमाणे गुरूवारी लाच देण्याचे ठरले.
उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडा येथे सापळा लावला. आशिष जाधव यांनी तीन हजार रुपये स्वीकारताच त्याला बेड्या ठोकल्या. दोन्ही जाधव विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बैठकीतून बाहेर पडताच अटक
४राजेंद्र जाधव हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. बैठकीत जाण्यापूर्वी त्यांनी आशिष जाधव यांच्याकडे पैसे देण्याचे सांगितले होते. बैठक संपून बाहेर पडताच त्यांच्या हातात पैशांऐवजी एसीबीने बेड्या ठोकल्या.