नोकरी लागत नसल्याने उच्चशिक्षित युवकाची शाळेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 03:31 PM2019-01-01T15:31:47+5:302019-01-01T15:35:07+5:30
वडील शिक्षक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कुलूप तोडून त्याने आत प्रवेश केला
केज (बीड ) : बीएस्सी अॅग्रीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतरही अनेकदा प्रयत्न करुनही नौकरी लागत नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून सुशिक्षित बेरोजगार युवकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील लहुरी येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली.
अक्षय गणपती चाळक (२३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अक्षयचे शिक्षण बीएस्सी अॅग्री झालेले होते. नौकरीसाठी त्याने अनेकदा प्रयत्न व पाठपुरावा करुनही नौकरी लागत नसल्याने तो नैराश्यात होता. त्यामुळेच त्याने लहुरी येथील लिंबाचावडा वस्तीवरील ज्या शाळेत वडील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्याच शाळेच्या खोलीचे कुलुप तोडुन आत प्रवेश करीत शाळेतील एका खोलीमध्ये लोखंडी गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शाळेच्या खोलीचे दार उघडे दिसल्याने वडिलांनी खोलीत डोकावून पाहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मुकुंद ढाकणे हे करत आहेत.