बीडमध्ये हायप्रोफाईल मटका अड्ड्याचा पर्दाफाश; पडक्या वाड्यातील 'हेडकॉर्टर'मधून चालायचा 'खेळ'
By सोमनाथ खताळ | Published: March 17, 2023 08:57 AM2023-03-17T08:57:19+5:302023-03-17T09:03:17+5:30
आयपीएस धीरजकुमार यांच्या पथकाची कारवाई : रोख पावणेपाच लाख रूपयांसह ३२ मोबाईल, कॅल्क्यूलेटर जप्त
बीड : पडक्या वाड्यात बसून जिल्ह्यातील मटका बुक्कीचा 'खेळ' खेळला जात होता. याच अड्ड्यावर आयपीएस धीरजकुमार यांच्या पथकाने धाड टाकली. तीन जुगाऱ्यांसह रोख पावणे पाच लाख रूपये, ३२ मोबाईल, कॅल्क्यूलेटर आणि इतर साहित्य असा लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी रात्री पावणे नऊ वाजता बीड शहरातील कबाड गल्लीत केली. हाय प्रोफाईल मटका अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून यामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांचाही हात असल्याचे सांगण्यात येत आहे.
केदार पवार, प्रवीण शेळके, सुनिल भालेराव असे पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. बीड शहरातील कबाड गल्लीत मटका अड्ड्याचे कार्यालय असल्याची माहिती धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ आपल्या पथकाला सुचना देत सापळा लावण्या सांगितले. गुरूवारी दुपारपासूनच काही कर्मचारी वेषभूषा बदलून याचा मागोवा घेत होते. परंतू अंधार पडताच पथकाने सर्व बाजून पडक्या वाड्यालावेढा मारला. आतमध्ये मटका सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा मारत तिघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून रोख ४ लाख ४६ हजार रूपयांची रक्कमही जप्त केली. यासोबतच ३२ मोबाईल, ३५ कॅल्क्यूलेटर, २ प्रिंटर, २ एलईडी स्क्रीन, ४ दुचाकी असा लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक डॉ. धीरजकुमार, सपोनि निलेश इधाटे, गणेश नवले, अशाेक नामदास, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे, संतराम थापडे, अजय गडदे, राजु कोकाटे आदींनी केली.
दररोज लाखोंची उलाढाल
याच पडक्या वाड्यातून जिल्ह्यातील मटका बुक्कींची माहिती घेतली जात होती. तसेच सर्व 'कलेक्शन'ही केले जात असे. यासाठी वेगवेगळ्या मोबाईलवरून एजंटांशी संपर्क केला जात होता. त्याची मोठी यादी असलेले रेकॉर्डही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे याची मोठी साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. याच कार्यालयाची माहिती कोणाला समजणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात होती. तसेच कोण आले, कोण गेले, याची माहिती व्हावी, यासाठी संपूर्ण गल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते, असेही पोलिसांनी सांगितले.