सोलपूरवाडी-आष्टी लोहमार्गावर बुधवार, गुरुवारी धावणार हायस्पीड रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 11:35 AM2021-12-24T11:35:04+5:302021-12-24T11:37:40+5:30
२९ व ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ दरम्यान सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे.
- नितीन कांबळे
कडा (जि.बीड) : बीड जिल्हावासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गापैकी नगर ते आष्टी मार्गावरील काम पूर्ण झाले आहे. सोलापूरवाडी ते आष्टी नवीन रेल्वेमार्गावर जलदगती चाचणी करण्यासाठी २९ व ३० डिसेंबर रोजी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. या लोहमार्गावर नागरिकांनी थांबू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले असून प्रशासन पातळीवर तशा सूचना करण्यात आल्या आहेत.
सोलपूरवाडी ते आष्टी लोहमार्गाचे काम पूर्ण झाले असून २९ व ३० डिसेंबर रोजी जलदगती चाचणी होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ दरम्यान सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. पिंपळा, कुंटफळ, कुंभेफळ, चिंचोली, धानोरा, साबलखेड, कडा, शेरी, जळगाव मांडवा, कासारी, राधापूर व आष्टी येथील तलाठी, सरपंच, मंडलाधिकारी, ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेऊन या मार्गावर लोंकानी थांबू नये, आपली जनावरे बांधू नयेत, आपल्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यअभियंता (निर्माण) मध्य रेल्वे अहमदनगरच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तशी कल्पना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे आष्टी, अंभोरा यांना देण्यात आली आहे.
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या अंतर्गत नगर ते आष्टी या ६४ किलोमीटर रेल्वेमार्गाचे तसेच पूल, स्टेशन आदी कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. नगर-आष्टी या मार्गावर ताशी १४४ किलोमीटर धावणाऱ्या हायस्पीड रेल्वेची चाचणी करण्यात येणार होती. २९ व ३० डिसेंबरला ही चाचणी होणार असल्याचे मध्य रेल्वे विभागाने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे. नगर-बीड रेल्वेमार्गासाठी अंदाजे २ हजार ८२६ कोटी रुपये खर्च येणार आहे. नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्य सरकारने या रेल्वेमार्गासाठी ९० कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.