बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दुसऱ्या क्षीरसागर पिता-पुत्राविरुद्धही गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 01:29 PM2022-02-26T13:29:24+5:302022-02-26T13:29:34+5:30
माजी नगरसेवक सतीश पवार यांची बहीण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भूखंड खरेदी केला होता.
बीड: येथील सहनिबंधक व मुद्रांक उपजिल्हाधिकारी कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोळीबार झालेल्या गोळीबार प्रकरणात माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर व बंधू माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर,अर्जुन क्षीरसागर यांच्याविरोधात देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायव्होल्टेज ड्रामा मुळे शहरातील राजकारण व क्षीरसागरांतील भाऊबंदकी शिगेला पोहोचली आहे.
माजी नगरसेवक सतीश पवार यांची बहीण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भूखंड खरेदी केला होता. २५ फेब्रुवारी रोजी खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे बंधू सतीश पवार हे सहनिबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी , आनंद पवार, गणेश भरनाळे, अशोक रोमण व इतरांनी रजिस्ट्री का करतो असे म्हणून मारहाण केली, तसेच कुकरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.यावेळी साडेपाच लाख रुपयांची पैशांची बॅग हिसकावली.यावरून दरोडा, प्राणघातक हल्ला, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.