विमा कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:45+5:302021-09-03T04:35:45+5:30
बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणांमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी बीड यांनी ५० ...
बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणांमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी बीड यांनी ५० टक्के नुकसान झालेल्याचा अंदाज व्यक्त करत २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश विमा कंपनीने नाकारले आहेत. याविरुद्ध मांजारसुंबा ते पाटोदा महामार्गावर लिंबागणेश येथे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती, तसेच कंपनीच्या जाचक अटी रद्द करून तत्काळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत माहिती दिली तरच लाभ मिळणार असल्याचे कंपनीकडून जाहीर केले आहे. मात्र, लाभ न देण्यासाठी असे प्रकार विमा कंपनीकडून केले जात असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने स्थळ पंचनामे करावेत व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरसकट देण्यात यावी, तसेच महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी यावेळी केली व जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, उपसरपंच शंकर वाणी, राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, गणेश मोरे, बाळासाहेब मुळे, कृष्णा पितळे, आकाश पितळे, बाळासाहेब वायभट, दत्ता घरत, पांडुरंग वाणी, अभिजित गायकवाड, विनायक वाणी, संतोष भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
020921\02_2_bed_22_02092021_14.jpg
लिंबागणेश येथे महामार्ग रोखण्यात आला