सामाजिक संस्था चालकाचे दिवसभरात दोन वेळेस अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:14 AM2018-08-19T01:14:52+5:302018-08-19T01:15:25+5:30
बीड : शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या एका सामाजिक संस्था चालकाचे तिघांनी शुक्रवारी दिवसातून दोन वेळेस अपहरण केले. शिरूर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सदर संस्था चालकाची सुटका करण्यात आली असून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथील नामदेव रामराव मिसाळ यांची शिक्षण प्रबोधिनी नावाची सामाजिक संस्था असून सध्या ते बीड शहरात जवाहर कॉलनीत वास्तव्यास आहेत. शुक्रवारी (दि. १७) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ते बीडमधील नगर रोडवरील एका हॉटेलशेजारी उभे असताना शिवाजी त्रिंबक मिसाळ व महारुद्र भिमराव केकाण हे दोघे तिथे आले आणि नामदेव मिसाळ यांना शिवीगाळ करू लागले.
मिसाळ यांनी जाब विचारातच त्या दोघांनी त्यांना खोकरमोहा येथील एका हॉटेलवर घेऊन गेले आणि तिथे डांबून ठेवले. दुपारी ४ वाजून गेले तरी सुटका न झाल्याने नामदेव मिसाळ यांनी शिरूर सहायक पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश टाक यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. टाक यांनी तातडीने पोहोचत नामदेव मिसाळ यांची सुटक केली आणि बीडकडे पाठवून दिले.
सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मिसाळ बीडला पोचले असता शिवाजी मिसाळ, महारुद्र केकाण आणि अन्य एक अनोळखी व्यक्ती असे तिघेजण पाठलाग करत तिथे धडकले. त्यांनी नामदेव मिसाळ यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करत एका कारमध्ये घातले आणि पुन्हा खोकरमोहा येथे घेऊन आले. तू पोलिसात केलेली तक्रार मागे घे, असा त्यांनी तगादा लावला आणि मिसाळ यांना घेऊन शिरुर पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक टाक यांनी सर्वांना जीपमध्ये बसवून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. तिथे नामदेव मिसाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजी मिसाळ, महारूद्र केकाण आणि अन्य एक अनोळखी व्यक्तीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.