२०२३ मध्ये हिंदू राष्ट्र; बीडमध्ये हिंदू धर्मजागृती सभेत वक्त्यांनी केला दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:27 PM2018-04-08T23:27:14+5:302018-04-08T23:30:41+5:30
भारत देशाला अखंड हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी जात, पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवून संघटीत व्हा, संघटन कार्य वाढवा, रोज एक तास वेळ धर्मासाठी द्या, असे आवाहन करतानाच देशविरोधी शक्तींशी लढण्यासाठी, अंतर्गत दहशतवादाशी लढण्यासाठी हिंदू जनजागृती समिती प्रत्येकाला ‘योद्धा’ बनविणार असल्याचे प्रतिपादन श्रीराम युवासेनेचे संस्थापक भाजपचे आ. टी.राजासिंह यांनी केले. सभेत सर्वच वक्त्यांनी २०२३ मध्ये अखंड हिंदू राष्ट्र स्थापन होणारच, असा दावा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भारत देशाला अखंड हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी जात, पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवून संघटीत व्हा, संघटन कार्य वाढवा, रोज एक तास वेळ धर्मासाठी द्या, असे आवाहन करतानाच देशविरोधी शक्तींशी लढण्यासाठी, अंतर्गत दहशतवादाशी लढण्यासाठी हिंदू जनजागृती समिती प्रत्येकाला ‘योद्धा’ बनविणार असल्याचे प्रतिपादन श्रीराम युवासेनेचे संस्थापक भाजपचे आ. टी.राजासिंह यांनी केले. सभेत सर्वच वक्त्यांनी २०२३ मध्ये अखंड हिंदू राष्ट्र स्थापन होणारच, असा दावा केला.
येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी जाहीर हिंदू धर्मजागृती सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर हिंदू जनजागृती समितीचे बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याचे समन्वयक मनोज खाडये, सनातन संस्थेच्या संत स्वाती खाडये, सुराज्य अभियानचे समन्वयक आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे महाराष्टÑ संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आदी उपस्थित होते.
धर्मजागृती सभेच्या अनुषंगाने आ. टी. राजासिंह हे आकर्षण होते. ‘भारत देश को अखंड हिंदू राष्टÑ बनाना सबका लक्ष्य हैं’ म्हणताच श्रोत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. ते म्हणाले, धर्म, परंपरांविषयी खोटा आणि विकृत इतिहास पसरविला जात आहे. भारताला अखंड ठेवायचे असेल तर प्रत्येकाने सैनिक व्हावे. ते म्हणाले, ‘हम दो, हमारे दो’ असा कायदा सगळ्यांना करावा, यासाठी पंतप्रधान आणि खासदारांना पत्र लिहिण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी नीलेश सांगोलकर म्हणाले, मंदिराचे सरकारीकरण घोटाळ्यांविरोधात हिंदू विधिज्ञ परिषद सातत्याने लढा देत आहे. पुरोगामी, राज्यकर्ते व पोलीस मुस्कटदाबी करणार असतील तर स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
यावेळी संत स्वाती खाडये यांनी धर्म जगला तर राष्ट्र आणि राष्ट्र जगले तर समाज जगेल, त्यामुळे जात, पात, संप्रदाय, पक्षात गुरफटलेल्या हिंदूंनी संघटीत होण्याचे आवाहन केले.
यावेळी मनोज खाडये म्हणाले, कायदा सर्वांसाठी सारखाच असावा. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयानुसार गरिबांच्या सामूहिक विवाहासाठी मंदिरातील धन वापरले जाणार आहे. हिंमत असेल तर सरकारने चर्च आणि मशिदीतील पैसाही यासाठी वापरुन दाखवावा, असे आव्हान दिले. भगवा दहशतवाद कधीच नव्हता आणि हिंदू दहशतवादी कधीच नव्हता. कायद्याने सोयीसुविधांसाठी हिंदू राष्ट्र स्थापना आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पावसानंतरही चोख नियोजन : हिंदू राष्ट्रचा जयघोष
रविवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे सभास्थळी अंथरलेल्या चटया गोळा झाल्या होत्या. महिला, पुरुष स्वयंसेवकांनी काही वेळेतच सभास्थळ सुसज्ज केले. सभास्थळी येणा-या प्रत्येकाचे औक्षण करुन गुलाब पाण्याचा वर्षाव केला जात होता. डास प्रतिबंधासाठी सभा परिसरात लिंबाच्या पाल्याचा धूर केला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वयंसेवकही त्यांना मदत करीत होते. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदूत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा राजश्री तिवारी यांनी मांडला. मिलिंद धर्माधिकारी आणि सुमित सागवेकर यांनी सूत्रसंचालन केले. राजन बुणगे यांनी आभार मानले.यावेळी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सभास्थळी क्रांतिकारकांची यशोगाथा आणि धर्माचरणाचे महत्त्व विशद करण्यासाठी बालकांनी वेशभूषा साकारली होती, ‘जय तू, जय तू हिंदू राष्ट्र’ याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मा जिजाऊ, झाशी की राणी, महाराणा प्रताप आदींचा जयघोष झाला.
‘जिहाद’ भयंकर षडयंत्र
‘लव्ह जिहाद’ हे भयंकर आॅर्गनायझेशन असल्याचे सांगत आ. राजासिंह म्हणाले, अनेक हिंदू मुली बेपत्ता आहेत, सिमीवर बंदी आणल्यानंतर लव्ह जिहादच्या माध्यमातून षडयंत्र रचले जात आहे. हिंदू जनजागृती समिती याबाबत प्रबोधन करीत असल्याने त्यांचे रक्षण होईल असे ते म्हणाले. एकीकडे देश विभाजनाची भाषा करणाºयांच्या विरोधात पोलीस काहीच बोलत नाहीत तर दुसरीकडे राष्ट्र कार्य करणा-यांवर पोलीस बंधने आणण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांनी केला. जातीच्या नावावर फूट पाडण्याचे काम सध्या सुरु असून, सर्व काही विसरुन देश आणि धर्म रक्षणासाठी एकत्रित येण्याचे आवाहन राजासिंह यांनी केले. यावेळी गोरक्षणाचे आवाहन त्यांनी केले. हिंदूंनी हिंदू हितालाच प्राधान्य दिले पाहिजे, असे आ. राजासिंह ठाकूर म्हणाले.