हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:21 AM2018-12-21T00:21:45+5:302018-12-21T00:22:33+5:30
कर्जमाफीच्या नावावर मोदी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केलेली सर्व आश्वासाने फोल ठरली आहेत. त्यांनी सामान्य नागरिकांसह, व्यापारी, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीच्या नावावर मोदी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केला. तसेच स्वराज इंडियाच्या माध्यमातून देशभरात हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान हा मुद्दा घेऊन जनगृती केली जाईल, असे ते म्हणाले.
बीड येथे गुरुवारी सकाळी योगेंद्र यादव यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा.सुभाष वारे, वचिष्ठ बडे यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती. पुढे बोलताना यादव म्हणाले, स्वराज इंडियाच्या माध्यमातून देशभर आयकॅन मोहीम राबवली जात आहे. यात सर्व नागरिकांना, स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. योग्य मुद्यांवर व्यापक जनमत तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या नावाखाली इतर मुद्दे दुर्लक्षित केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कर्जमाफीपेक्षाही शेतमालाला योग्य भाव महत्त्वाचा असून, त्यात मात्र कोणालाच रस नसल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती द्या परंतु शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही? याचीही काळजी घ्या असा सल्लाही यादव यांनी दिला.
हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एकमेंकाविरुद्ध द्वेष पसरवला जात आहे. दोघांमध्ये भांडण लावण्याचे काम सत्तेतील लोक करत आहेत. नक्षलवादाला देशद्रोह म्हणून संबोधणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये भांडणे लावणे, द्वेष पसरविणे हाच खरा देशद्रोह असल्याचा आरोप यादव यांनी यावेळी केला.