हिंगणीचा सरस्वती मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:35 AM2021-07-28T04:35:23+5:302021-07-28T04:35:23+5:30
संतोष स्वामी दिंद्रुड : धारुर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती मध्यम प्रकल्प हा बालाघाटच्या डोंगरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. यंदा ...
संतोष स्वामी
दिंद्रुड : धारुर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती मध्यम प्रकल्प हा बालाघाटच्या डोंगरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. यंदा बालाघाटच्या डोंगरात पाऊस चांगला झाल्याने जुलै महिन्यात सरस्वती मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून यामुळे शेतकऱ्यात समाधानकारक वातावरण आहे.
धारुर तालुक्यातील सरस्वती मध्यम प्रकल्प स्वर्गीय सुंदर रावजी सोळंके यांनी जवळपास चाळीस वर्षांपूर्वी उभारला. या प्रकल्पामुळे जवळपास पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांना शेती मशागत करण्यास मोठा फायदा झाला असून यावर्षी पाऊस चांगला झाल्याने जुलै महिन्यात हा प्रकल्प शंभर टक्के भरला. जवळपास ७.२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पात साठवण्यात आलेला असून सांडव्यावरून आता पाणी सरस्वती नदीद्वारे गोदावरी नदीकडे विसर्ग चालू झाला आहे. गतवर्षी १५ ऑक्टोबर रोजी केवळ ६४ टक्के पाणीसाठा या प्रकल्पात होता. मे महिन्यात मृत साठ्यात गेलेला हा प्रकल्प या वर्षी केवळ एका महिन्यातच शंभर टक्के भरला आहे. हिंगणी बु., हिंगणी खु, कांदेवाडी, मोहखेड आदी गावांसह आसपासच्या छोट्या मोठ्या वस्त्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा मिळत आहे.
यावर्षी पाऊसमान चांगले असून जुलै महिन्यातच शंभर टक्के तलाव भरल्यामुळे मुबलक पाणीसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे. येत्या उन्हाळ्यामध्ये जवळपास पाच ते सहा किलोमीटरपर्यंत पाटाद्वारे पाणी शेतकऱ्यांना मागणीनुसार देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागास करता येणार आहे.
-शेख एम. डब्ल्यू., कनिष्ठ अभियंता,पाटबंधारे उपविभाग तेलगाव
२.
यावर्षी बालाघाटच्या डोंगरात पाऊस चांगला झाल्याने जुलै महिन्यात सरस्वती प्रकल्प शंभर टक्के भरला. यामुळे हिंगणी, कांदेवाडी, कचारवाडी ह पाच ते सहा गावांना पिण्याचे पाणी व शेती मशागत करण्यासाठी पुरेसे पाणी मिळणार असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.
- मीरा केशव खाडे, सरपंच, हिंगणी बु.