मराठवाड्यातील नाट्यपरंपरेचा इतिहास येणार समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:25+5:302021-09-06T04:37:25+5:30
वाचक, अभ्यासकांना उपयुक्त ठरणार बीड : मराठवाड्यातील नाट्य परंपरेचा प्राचीन ते अर्वाचीन इतिहास मांडणाऱ्या ‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ ग्रंथाचे काम अंतिम ...
वाचक, अभ्यासकांना उपयुक्त ठरणार
बीड : मराठवाड्यातील नाट्य परंपरेचा प्राचीन ते अर्वाचीन इतिहास मांडणाऱ्या ‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ ग्रंथाचे काम अंतिम टप्प्यात असून वाचक, अभ्यासकांसाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. नाटककार, दिग्दर्शक आणि इतिहास अभ्यासक डॉ. सतीश साळुंके हे या संशोधनात्मक ग्रंथाचे लेखक आहेत. त्यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
नाट्य अभ्यासक प्रा. दत्ता भगत यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली असून पद्मश्री वामन केंद्रे यांनी ग्रंथासाठी ‘बल्ब’ लिहिला आहे. ग्रंथास मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले, प्रकाशक कुंडलिका अतकरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांचे साहाय्य लाभले आहे.
१०५० पानांचा ग्रंथ
प्राचीन ते अर्वाचीन कालखंडाच्या वेगवेगळ्या टप्प्यात मराठवाड्यात नाटक कसे उभे राहिले आणि मराठवाडी लोकरंगभूमीतून नाटकाचे अभिजातीकरण कसे झाले याची चिकित्सा, तसेच मराठवाड्यातील अनेक गावांतील शतायुषी रंगभूमीचा परामर्श घेत ‘नाटक’ हे मराठवाड्याने मराठी माणसाला दिलेली देन असल्याची मूलभूत संशोधनात्मक मांडणी करणारा हा ग्रंथ जवळपास १०५० पानांचा आहे.
नाट्यकर्मींच्या योगदानाचा आढावा
या ग्रंथात मराठवाड्यातील नाटकांच्या उगमस्थानांचा शालिवाहन कालखंडापासून परामर्श घेण्यात आला असून मराठवाड्यातील जवळपास दीड हजार नाट्यकलावंतांच्या रंगकार्याचा उल्लेख आहे; तर तब्बल दीडशे नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाटककार व तंत्रज्ञांचा मराठवाड्याच्या नाट्यचळवळीत योगदानाचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. या ग्रंथात सतरा विभाग असून त्यात विविध कालखंडांची विभागणी करून त्या त्या काळात मराठवाड्यातील नाटकाच्या उगमस्थानासह उत्कर्षावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
चार वर्षांपासून संशोधन
मराठवाड्यातील नाट्यलेखन, शैक्षणिक रंगभूमी, दलित रंगभूमी, बाल रंगभूमी, कामगार रंगभूमी, तंत्रज्ञ रंगभूमी, नाट्यगृहांची परंपरा व मराठवाड्याच्या आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार अशा रंगप्रवाहांवर विस्तृत प्रकाश टाकला गेला आहे. ग्रंथात मराठवाड्यातील संगीत नाटक, प्रयोगशील नाटक आणि हौशी रंगभूमीविषयी विस्तृत विवेचन केले आहे. गत चार वर्षांपासून डॉ. साळुंके प्रस्तुत संशोधन करीत होते.